Maharashtra Kesari : रंगणार लाल मातीतील थरार ! धाराशिव येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा | पुढारी

Maharashtra Kesari : रंगणार लाल मातीतील थरार ! धाराशिव येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित 65 वी वरिष्ठ गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत धाराशिव येथे होणार आहे, अशी माहिती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आयोजक सुधीर पाटील, अर्जुनवीर काका पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुस्ती प्रशिक्षक विजय बराटे, रुस्तम ए हिंद अमोल बुचडे, ललित लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा तुळजाभवानी स्टेडियम, धाराशिव, उस्मानाबाद या ठिकाणी दि 16 ते 20 नोव्हेंबर होणार असून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व उस्मानाबाद तालीम संघ यांच्या सहकार्याने होत आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवे मुंबई हायकोर्टाने सर्वाधिकार आबादीत ठेवलेले आहेत. कुस्तीगीर परिषदेचे सर्व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेण्याचे अधिकार अबाधित आहेत. त्यामुळे 65 वी वरिष्ठ गट शादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लदत धाराशिव उस्मानाबाद येथेच होणार आहेत. त्याचबरोबर यावर्षीची 65 वी किताबाची लढत होणार आहे. गेल्यावर्षी झालेली स्पर्धा ही अनधिकृतच असून परिषदेच्या वतीने होणारी स्पर्धाच अधिकृत असून मल्लानी याच स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन लांडगे यांनी यावेळी केले आहे.
संलग्नता पत्र दाखवून गैरसमज पसरविण्याचे काम
भारतीय कुस्ती संघाची जानेवारी महिन्यामध्ये भारत सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने भारतीय कुस्ती संघाची कार्यकारणी त्यांच्या गैरकारभार व गैरवर्तणुकीमुळे बरखास्त करून भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अस्थाई समितीमार्फत भारतीय कुस्ती संघाचा कारभार चालू आहे तसेच, जागतिक कुस्ती संघटनेने ही भारतीय कुस्ती महासंघाची संलग्नता काढून टाकलेली आहे. परंतु असे असताना एक अनाधिकृत कुस्ती संघटना बरखास्त झालेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे संलग्नता पत्र दाखवून सर्वांमध्ये गैरसमज पसरवत आहेत.
दोन कोटींची पारितोषिके
65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आयोजकांनी तब्बल दोन कोटींची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये किताब विजेत्याला स्कारपियो तर उपविजेत्याला टॅक्टर तसेच 20 वजनी गटातील विजेत्यांना ही दुचाकी भेट देण्यात येणार आहे.
कायदेशीर कारवाई करणार
दोन दिवसांपूर्वी काही जणांनी स्पर्धा जाहीर केल्या आहेत. मात्र परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत सर्वांच्या मतानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे ही लांडगे यांनी यावेळी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
65 वी वरिष्ठ गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताबाच्या स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर पारितोषिक वितरण खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह क्रीडामंत्री, विविध मंत्री उपस्थित राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : 

Back to top button