ऐकावं ते नवलच ! एकासाठी रस्त्यात भिडल्या तिघीजणी !! | पुढारी

ऐकावं ते नवलच ! एकासाठी रस्त्यात भिडल्या तिघीजणी !!

दौंड : पुढारी वृत्तसेवा :  म्हणतात ना, ’प्रेमासाठी वाट्टेल ते’… याचाच अनुभव दौंडकरांना सोमवारी (दि. 25) भर दुपारी आला.
तीन मुली दुचाकीवरून दौंड शहरातील गजबजलेल्या हुतात्मा चौकात येतात व समोर असलेल्या एका मुलीला अचानक मारहाण करायला सुरुवात करतात, त्यामुळे शहरातील नागरिकांना काय चालले आहे, हे समजायला मार्गच नाही. यांच्या या ‘फ्री स्टाईल’ हाणामारीमुळे शहरातील हुतात्मा चौकात वाहतुकीची कोंडी होते. ही घटना भर दुपारी चौकात झाली.

नागरिकांनी हा प्रकार पाहून शहरातील वाहतूक पोलिसांना फोन केले. परंतु, ही हाणामारी कशामुळे चालली? हे मात्र गुलदस्तातच होते. हाणामारीची मजा रस्त्यावरील नागरिक व आजूबाजूचे दुकानदार पाहत होते. तेव्हा त्यातली एक जण म्हणाली, ‘तू माझ्या मित्राला अश्लील संदेश भ्रमणध्वनीवर का केला?’ तेव्हा नागरिकांना काय ते कारण समजले.

आता मुलीदेखील खुलेआम रस्त्यावर अशा मारामार्‍या करायला लागल्या, तर त्यांच्या पालकांनी काय करायचे? अशा मुलींना आपल्या प्रियकरासाठी या थराला जावे लागते, ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. आपल्या मुली घरातून दुचाकी घेऊन निघाल्यावर कुठे जातात? काय करतात? पालकांनी याकडे लक्ष दिले पाहिजे; अन्यथा एखादा अनुचित प्रकार घडला, तर याला जबाबदार कोण? हा प्रश्नदेखील उपस्थित होतो. वयात आलेल्या मुली अशा प्रकारे खुलेआम हाणामार्‍या करीत असतील तर ही बाब निश्चितच पालकांसाठी चिंतेची आहे. याकडे पालकांनी आपल्या मुलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी चर्चा या प्रकारानंतर शहरात सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button