

बावडा : पुढारी वृत्तसेवा : बावडानजीक शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा-भीमा साखर कारखाना परिसरात सोमवारी (दि. 25) रात्री विक्रमी 145 मि. मी. पाऊस झाला. बावडा येथेही 82 मि. मी. पाऊस पडला. जोरदार पावसाने शेतकरीवर्गात उत्साह निर्माण झाला आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.26) दुपारीही बावडा परिसरात अर्धा तास पाऊस झाला.
इंदापूर तालुक्यात एका दिवसामध्ये विक्रमी 145 मि. मी. पाऊस होण्याची ही बहुतेक पहिली वेळ आहे. विजेचा कडकडाट व ढगांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने बावडा परिसरामध्ये ओढे-नाले पाण्याने खळखळून वाहू लागले. पाझर तलाव, तळी, सिमेंट बंधारे यामध्ये पाणीसाठा झाला आहे. पावसामुळे आगामी रब्बी हंगामाबाबत आशा निर्माण झाली आहे. भूजलसाठा वाढण्यासही त्यामुळे मदत होणार आहे. इंदापूर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसांमुळे दुष्काळाचे सावट आता दूर झाले आहे.
बावडा परिसरात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. त्याचा सर्वाधिक फायदा ऊस पिकाला होणार आहे. ऊस पिकाची दमदार वाढ होऊन टेनेज वाढण्यास मदत होणार आहे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. एकंदरीत, दमदार पावसांमुळे शेतकरी, नागरिक, व्यापारी व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरडा तलाव रात्रीत भरला!
बावडा येथील खंडोबानगरचा पाझर तलाव सोमवार (दि. 25) पर्यंत कोरडा होता. मात्र, रात्री झालेल्या मुसळधार पावसाने हा तलाव एका रात्रीत भरला. त्यामुळे बावडा ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटल्याचे माजी सरपंच किरणकाका पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा :