Pune Ganeshotsav 2023 : प्रमुख मंडळांचा निर्णय जागेवरच घेणार; पोलिस आयुक्त रितेशकुमार यांची माहिती | पुढारी

Pune Ganeshotsav 2023 : प्रमुख मंडळांचा निर्णय जागेवरच घेणार; पोलिस आयुक्त रितेशकुमार यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लक्ष्मी रस्त्यावरून पहिले मानाचे पाच गणपती मार्गस्थ झाल्यानंतर अन्य मंडळांना जागा करून दिली जाईल. मिरवणुकीत मंडळांना सोडताना परिस्थितीनुसार जागेवरच निर्णय घेण्यात येईल, असे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यंदा दुपारी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. तर अन्य मंडळे सायंकाळी उशिरा दरवर्षीप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील, असे त्या मंडळांच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतरही पोलिस आयुक्तांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.

ते म्हणाले की, आम्ही जागेवर परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेऊ. सर्वांच्या सहकार्याने कमीत-कमी वेळेत मिरवणूक संपविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. या वेळी सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त आर. राजा, परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त वाहतूक पोलिस उपायुक्त संदीप गिल, वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर या वेळी उपस्थित होते.

रितेश कुमार यांनी सांगितले, मानाच्या मंडळांसह इतर प्रमुख मंडळांच्या पदाधिकार्‍यांची आम्ही बैठक घेतली असून त्यांनी मिरवणुकीबाबत संपूर्ण सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, की, निर्धारित वेळेत आनंदपूर्ण वातावरणात ही मिरवणूक संपन्न होईल. आठ दिवसांपासून पोलिस चोख बंदोबस्त बजावत आहेत. विसर्जन मिरवणुकीसाठीदेखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शहरातील गणेशोत्सवाची वैभवशाली विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी तब्बल नऊ हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त असणार आहे. यामध्ये होमगार्ड आणि एसआरपीएफच्या दोन तुकड्यांचाही समावेश असणार आहे. मिरवणुकीच्या मुख्य चारही मार्गांवर पोलिसांची 40 पथके तैनात असणार आहेत. दरम्यान, मागील दोन महिन्यांत तेरा हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शिवाय, शहरात दहशतवादी सापडल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व प्रकारची काळजी घेतली आहे.

शहरात यंदा 3 हजार 865 गणेश मंडळे आणि 6 लाख 14 हजार 257 घरगुती गणपतींची स्थापना झाली आहे. मागील काही दिवस शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ढोलताशा पथके आणि इतर शासकीय विभाग यांच्यासोबत पोलिसांच्या समन्वय बैठका झाल्या आहेत. पोलिस दलातील बीडीडीएस पथके, क्यूआरटी आणि आरसीपी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच परजिल्ह्यांतूनही काही मनुष्यबळ मागवण्यात आले आहे.

उत्सवात काही अनुचित घटना घडू नयेत, म्हणून गोपनीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुख्य मिरवणुकीच्या मार्गावर मार्गदर्शनासाठी जागोजागी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. सोनसाखळी चोरी आणि महिलांची छेडछाड रोखण्यासाठी वेगवेगळी पोलिस पथके तैनात करण्यात येणार आहेत. आणिबाणीच्या परिस्थितीत रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत केंद्र उभारण्यात आले आहेत.

असा असेल बंदोबस्त

सहायक पोलिस आयुक्त : 25,
सहायक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक : 578 अंमलदार : 6,827, होमगार्ड : 950,
एसआरपीएफ : 2 कंपन्या असणार आहेत.

वाहतुकीसाठी काही रस्ते राहणार बंद

  • वाहतुकीसाठी बंद रस्ते : शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सोलापूर रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता, गुरू नानक रस्ता.
  • डायव्हर्जन पॉईंट : जंगली महाराज रस्ता-झाशी राणी चौक, शिवाजी रस्ता-काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलीयार रस्ता-दारूवाला पूल, लक्ष्मी रस्ता-संत कबीर चौक, सोलापूर रस्ता-सेव्हन लव्हज चौक, सातारा रस्ता-व्होल्वा चौक, बाजीराव रस्ता-सावरकर पुतळा चौक, लालबहादूर शास्त्री रस्ता- सेनादत्त पोलिस चौकी, कर्वे रस्ता-नळस्टॉप, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता-गुडलक चौक.
  • रिंग रोड : सेनापती बापट रस्ता- गणेशखिंड रस्ता-आंबेडकर रस्ता-नेहरू रस्ता-शिवनेरी रस्ता- सातारा रस्ता-सिंहगड रस्ता- लाल बहादुर रस्ता.
  •  नो पार्किंग केलेले रस्ते : लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता.
  • वाहतूक बंदोबस्त : पोलिस उपायुक्त -1, पोलिस निरीक्षक -13, सहायक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक -33, अंमलदार-775, ट्रॅफिक वॉर्डन-100, स्वयंसेवक -200

पथकात पन्नास ढोल आणि पंधरा ताशा

मागच्या वर्षी 30 तासांपेक्षा जास्त वेळ विसर्जन मिरवणूक सुरू होती. यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण व्हावी यासाठी मानाच्या 5 आणि महत्त्वाच्या 5 गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत 3 ढोल पथकाचे वादन असणार आहे. उर्वरित मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी फक्त 2 ढोल पथकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच एका ढोलताशा पथकात 50 ढोल आणि 15 ताशा असणार आहेत. तसेच लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग चौक, सेवासदन (शगुन चौक) आणि टिळक चौक (अलका चौक) येथे 10 मिनिटे स्थिर वादन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वाहने पार्क करण्यासाठी 26 ठिकाणी व्यवस्था

गणेशोत्सवात नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहने पार्क करण्यासाठी 26 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वाहतूक मार्गदर्शनासाठी ‘सारथी गणेशोत्सव गाईड 2023’ चे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये मुख्य सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहून गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग व वाहतूक डायव्हर्शन केलेल्या रस्त्यांवर निगराणी ठेवण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा

Asian Games 2023 | नौकानयन क्रीडा प्रकारात भारताला तिसरे कांस्यपदक

कोल्हापूर : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

NIA raids : गँगस्टर-दहशतवादी संबंधाबाबत NIA चे देशभरात ५१ ठिकाणी छापे

Back to top button