पिंपरी : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत विविध क्षेत्रात वाढलेले टार्गेट्स, मर्यादेपेक्षा कामाची जादा जबाबदारी, वेळेत काम पूर्ण करण्यासाठी सुरू असलेली धावपळ अशा विविध कारणांमुळे कामाच्या ठिकाणी ताण वाढू लागला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीसाठी येणार्या रुग्णांमध्ये साधारण 20 ते 30 टक्के रुग्ण हे ताणतणावशी संबंधित असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
आयटी क्षेत्रात तसेच, विविध कार्पोरेट कंपन्यांमध्ये कामाच्या डेडलाईन ठरलेल्या असतात. दिलेल्या वेळेत ठराविक काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिलेले असते. बर्याचदा मर्यादेपेक्षा अधिक कामही एकाच व्यक्तीकडे सोपविले जाते. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण निर्माण होतो. कुटुंबासाठी खूप कमी वेळ मिळतो. काही जण कामाला वाहून घेऊन अक्षरशः 12 ते 14 तास काम करतात. पर्यायाने वर्क लाइफ बॅलन्स टिकविण्यात अडचणी येतात.
कामाचा अतिताण घेतल्याने त्याचा परिणाम आरोग्यावरदेखील होतो. लवकर थकवा येणे, उच्च रक्तदाब, नैराश्य येणे, चिडचिड, चिंतारोग, झोपेची समस्या तसेच जीवनशैलीशी संबंधित मधुमेह हा आजार उद्भवतो.
नोकरी न मिळणे, कामाचे पैसे वेळेवर न मिळणे, कामाच्या ठिकाणी तणावजन्य परिस्थिती असणे अशा विविध कारणांमुळे शहरातील मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीसाठी येणार्या रुग्णांचे सरासरी प्रमाण हे 20 ते 30 टक्के असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. वाढत्या ताणतणावामुळे व्यसनाधीनतेमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षणही मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
कामाच्या अतिताणामुळे बर्याचदा आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आजार जडू शकतात. माझ्याकडे तपासणीसाठी येणार्या रुग्णांपैकी 20 ते 30 टक्के रुग्णांमध्ये ताणतणावाची समस्या पाहण्यास मिळते. ताणतणावाचे व्यवस्थापन; तसेच सकारात्मक विचारांचा अंगीकार करणे गरजेचे आहे.
-डॉ. धनंजय अष्टुरकर, मानसोपचार तज्ज्ञ.
वायसीएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात तपासणीसाठी येणार्र्या रुग्णांमध्ये शेतकरी, कामगार यांचे प्रमाण जास्त असते. हाताला काम नसणे, कामाचे पैसे वेळेत न मिळणे अशा समस्या त्यांना जाणवतात. वाढत्या ताणतणावामुळे विविध व्यसनांच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. कामाचे व वेळेचे नियोजन करावे. व्यायाम, झोप आणि आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
– डॉ. मधुर राठी, मानसोपचार तज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय.
हेही वाचा