पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहर परिसरातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मोकाचे अस्त्र उपसले आहे. आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर यावर्षी सर्वाधिक म्हणजेच तब्बल 272 जणांवर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) नुसार कारवाई करण्यात आली आहे. नऊ महिन्यांत एवढ्या मोठ्या स्वरूपात कारवाई झाल्याने गुन्हेगार सैरभैर झाल्याचे चित्र आहे.
शहर पोलिस आयुक्तालयातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. संघटित गुन्हे करणार्या टोळ्यांना रेकॉर्डवर घेऊन त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे 95 टोळ्या रेकॉर्डवर घेऊन त्यांची मुस्कटदाबी करण्यात आल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.
याव्यतिरिक्त छोट्या गुन्हेगारांवरदेखील जरब राहावी, यासाठी पोलिस आयुक्त चौबे यांच्या सूचनेनुसार अवैध शस्त्र जप्त करणे, पाहिजे, फरार आरोपी पकडणे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा राबवण्यात आल्या. अंतर्गत स्पर्धेमुळे गुन्हेगारांवर एकापेक्षा जास्त पोलिसांचा वॉच आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिसही मागावर असल्याचे माहिती झाल्याने अनेक गुन्हेगार अंडरग्राउंड झाल्याचे दिसून येते.
मोका कारवाई होणार असल्याचे समजताच गुन्हेगार राजकीय मंडळींची दारे ठोठावतात. काही राजकीय मंडळी संबंधित गुन्हेगारांना मोक्यातून बाहेर काढण्याचे आश्वासनही देतात. मात्र, मोका कारवाई करताना गय करू नका, असे वरिष्ठांचे स्पष्ट आदेश असल्याने पोलिस अधिकारीदेखील राजकीय मंडळींचे ऐकत नाहीत. वाकड येथील एका गुन्हेगाराचा मोका तोडण्यासाठी मोठ्या पक्षाचे पदाधिकारी प्रयत्न करीत होते. मात्र, पोलिस अधिकार्यांनी वशिला न जुमानता संबंधित गुन्हेगारावर कारवाई केली.
हेही वाचा