

कधी काळी केवळ हिंदी- मराठी सिनेमे बघणारा प्रेक्षक आज फ्रेंच, कोरियन, स्पॅनिश आणि दाक्षिणात्य सिनेमे बघू लागला आहे. तर चेतन भगत, झुम्पा लाहिरी, अमिष त्रिपाठी, भैरप्पा यांनी लिहिलेले बहुभाषिक साहित्य आज केवळ अनुवादाच्या माध्यमातून वाचणे शक्य झाले आहे. (International Translation Day )
अनुवादामुळे वैचारिक देवाण-घेवाण तर होते, पण कथेपेक्षाही कादंबरी हा जीवनाचा तुकडा, मोठा पट असतो. यामध्ये लेखकाची मानसिकता, दृष्टिकोन समजतो तर कथेमध्ये लेखकाला फार व्यक्त होता येत नाही. त्यामुळे कथेपेक्षा, कादंबरीतून लेखक जास्त समजतो. अनुवाद ही पूर्वापार चालत आलेली प्रक्रिया आहे. भारतातील ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेले असले तरी ब्रिटिश राजवटीनंतर त्या ग्रंथांचे इंग्रजी भाषेत अनुवादन करण्यात आले. भाषा ही दोन संस्कृतींना एकत्र जोडण्याचे काम करते. अनुवाद ही कला आहे. जी शब्दांना वाक्यात गुंफण्याचे काम करते. अनुच्छेद वाचून उतरून काढण्याला अनुवाद म्हणत नाही, तर लेखकाला काय म्हणायचे आहे त्याचा मूळ गाभा न बदलता त्यानुसार योग्य शब्दांची पेरणी करणे म्हणजे अनुवाद. जसे एका शब्दाला अनेक समानार्थी शब्द असल्याने कोणता शब्द वापरणे योग्य ठरते ते अनुवादकाच्या कलेवर अवलंबून असते. पुस्तक वाचणे असो किंवा सिनेमे बघणे अनुवादामुळे ते आता सहज शक्य झाले आहे. (International Translation Day)
उत्तर, पश्चिम भारतात डबिंगमुळे दाक्षिणात्य सिनेमांची लोकप्रियता भूतो न भविष्यती वाढली. टीव्ही चॅनलवर डबिंग सिनेमे धुमाकूळ घालत असताना, थिएटरमध्ये बाहुबली, केजीएफ, पुष्पा सिनेमांनी रेकॉर्डतोड यश मिळविले. ओटीटीवर भारतीय प्रेक्षकांचा परिचय जगातील वेगवेगळ्या भाषांमधील कंटेटशी झाला. डबिंग व्हर्जन, सब टायटल्स, अनुवादित दृक्श्राव्य कंटेट भारतीयांना जगभरातल्या कंटेंटशी जोडण्यात एका ग्लूची भूमिका बजावत आहे.
-अमोल उदगीरकर, चित्रपट अभ्यासक, पुणे
अनुवाद करताना दोन्ही भाषांवर पकड असावी लागते. परंतु ज्या भाषेत व्यक्त व्हायचे आहे ती काकणभर जास्त यायला पाहिजे. तसेच मूळ कलाकृतीला कुठेही धक्का न पोहोचता तिचे बलस्थान ओळखून, माझा वाचक कोण आहे त्यानुसार शब्द पेरावे लागतात. मग तिथे दोन वाक्यांचे एक वाक्य करावे लागले तरी चालते. मराठीत लिहिताना लोकमान्य लिहिले तरी वाचकांच्या लगेच लक्षात येईल, पण कन्नडमध्ये भाषांतर करताना त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल हा फरक असतो.
– उमा कुलकर्णी, अनुवादक, पुणे
का साजरा केला जातो?
आज (दि.३०) सप्टेंबर जागतिक अनुवाद दिन. बायबलचे अनुवादक सेंट जेरोम यांच्या स्मरणार्थ जागतिक अनुवाद दिन साजरा केला जातो. जगभरातील प्रत्येक भाषा शिकणे शक्य नसल्याने अनुवादामुळे कोणतीही गोष्ट समजणे सहज शक्य होते. १९५३ मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सच्या स्थापनेपासून जागतिक अनुवाद दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
हेही वाचा :