मुंबई; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करणाच्या राज्य सरकारने चार दिवसांपूर्वी जिल्हा व महसूल क्षेत्राच्या नामांतराची अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेला नव्याने आव्हान देणाऱ्या दोन याचिकांची उच्च न्यायालयाने दखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने त्यावर शुक्रवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याबाबत अंतिम अधिसूचना काढण्यात आली नसल्याची कबुली देताना राज्य सरकारने जिल्हा व महसूल पातळीवरील दस्तऐवजावर तूर्त जुन्याच नावांचा वापर करण्याची हमी राज्य सरकारने दिली होती. मात्र, त्यानंतर १५ सप्टेंबरच्या रात्री या दोन जिल्हे व महसूल क्षेत्रांचे अधिकृतपणे नामकरण करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली. त्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी जिल्हा व महसूल क्षेत्राच्या नामांतराची अंतिम अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नसल्याने खंडपीठाने काही याचिका मागे घेण्याचा सल्ला देत ३० ऑगस्ट रोजी निकाली काढल्या होत्या. तसेच अधिसूचना जारी झाल्यास नव्याने याचिका दाखल करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार या याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर आता २९ सप्टेंबरला सुनावणी होईल.