पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जुलै-ऑगस्ट 2023 च्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत असलेल्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. सीबीएसईने 20 जुलैला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजेच सीटीईटी आयोजित केली होती.
परीक्षा आयोजित केल्यानंतर सीबीएसईने 15 सप्टेंबर रोजी परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध केली होती. 18 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांकडून हरकती मागविल्या होत्या. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या आक्षेपांचे पुनरावलोकन केल्यानंतर सीबीएसईने सोमवारी सीटीईटी निकाल ऑगस्ट 2023 जाहीर केला आहे.
उमेदवारांना ctet. nic. in या लिंकवर संबंधित निकाल त्यांचा रोल नंबर भरून आणि सबमिट करून निकाल पाहता येणार आहे. सीटीईटी जुलै सत्राच्या परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर सीबीएसईद्वारे यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांना बोर्डाकडून सीटीईटी प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवार विविध प्राथमिक (इयत्ता 1 ते 5 वी) आणि देशभरातील सीबीएसईच्या शाळा, केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालये, तसेच अन्य माध्यमिक शाळांमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात.
विविध राज्यांच्या सरकारी आणि खासगी शाळांमध्ये शिक्षक उच्च प्राथमिक (इयत्ता 6 ते 8 वी) वर्गातील पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकतील. सीबीएसईने सध्या फक्त सीटीईटी निकाल जुलै 2023 अंतर्गत गुणपत्र जाहीर केले आहेत, तर त्यांची सीटीईटी प्रमाणपत्रे नंतर प्रसिद्ध केली जातील, असे निर्देश बोर्डाने दिले आहेत.
हेही वाचा