

बारामती : पुढारी वृत्तसेवा : आपले अर्थमंत्रिपद किती दिवस राहील माहीत नाही. मात्र, जोवर पद आहे तोपर्यंत बारामतीसाठी भरघोस निधी देऊ, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बारामतीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. पवार यांच्या या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपद व अर्थमंत्रिपद देण्यात आले.
त्यांच्या एका विधानाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. बारामती दौर्यावर एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेल्या विधानाने चर्चा रंगली आहे. अर्थमंत्रिपदाबाबत ते म्हणाले, सध्या माझ्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते. मात्र, यापुढे अर्थखाते टिकेल की नाही, सांगता येत नाही. अर्थमंत्रिपदाच्या माध्यमातून बारामतीसह राज्याला न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल.
…म्हणून अमित शहांच्या दौर्याप्रसंगी अनुपस्थित
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अलीकडे पार पडलेल्या मुंबई दौर्यावेळी अजित पवार उपस्थित नव्हते. त्याबाबत खुलासा करताना त्यांनी सांगितले की, माझा बारामती व पिंपरी-चिंचवडचा दौरा पूर्वनियोजित होता. तसे मी अमित शहा यांच्या कार्यालयाला कळविले होते. त्यामुळे मी त्यांच्या दौर्याप्रसंगी उपस्थित नव्हतो.
हेही वाचा :