Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर मार्ग निघेल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास | पुढारी

Dhangar Reservation : धनगर आरक्षणावर मार्ग निघेल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पुणे; पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्रीसुद्धा सकारात्मकता दाखवत आहेत, त्यामुळे यावर निश्चित मार्ग निघेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. फडणवीस यांनी गुरुवारी शहरातील मानाच्या गणपतींसह इतर मंडळांच्या बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. कसबा गणपती मंडळाच्या उत्सव मंडपात माध्यमांशी ते बोलत होते. या वेळी आमदार माधुरी मिसाळ, माजी राजसभा सदस्य अमर साबळे, भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

महिला आरक्षणावर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी पुरुष मंडळी कारभार पाहतील, असे विधान केल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, महापालिका, जिल्हा परिषद यामध्ये महिलांना आरक्षण दिले. त्या वेळीदेखील अशाच प्रकारची विधान करण्यात आली होती. पहिल्या पाच वर्षांत त्या प्रकारचे वातावरण होते. पण त्यामध्ये हळूहळू बदल होत गेला. तसेच आजही आरक्षण नसताना संसदेत 81 महिला खासदार आहेत. आता आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 100 महिलांची भर पडणार आहे.

त्यामुळे मी कडू यांच्या मताशी सहमत नसल्याची भूमिका फडणवीस यांनी मांडली. लालबागचा राजा गणपती मंडळाच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, पोलिसांचा बंदोबस्त कमी पडलेला नाही. लालबाग मंडळाशी आम्ही चर्चा करतो. पण खरं आहे की, खूप गर्दी होते आणि त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त पुरेसा आहे.

‘सर्व विघ्न दूर कर, बाप्पा’

मी दरवर्षी पुण्यात येऊन मानाच्या गणपतींचे दर्शन घेत असतो. पुण्याचे आणि गणेशोत्सवाचे नाते आहे. पुणे शहरातून सार्वजनिक गणेशोत्सव देशभर पोहोचला आहे. त्याची खरी सुरुवात पुण्याने केली आहे. सर्व विघ्ने दूर करावीत, अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

या गणपती मंडळांना दिली भेट

कसबा गणपती, – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई गणपती, तुळशीबाग गणपती, लोकमान्य टिळक गणेशोत्सव, सहजीवन मित्र मंडळ, साने गुरुजी मित्र मंडळ, साई सार्वजनिक गणेश मंडळ.

हेही वाचा

Kolhapur News | गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेवरून ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष

नाशिकमध्ये अडीच लाखांचा भेसळयुक्त मावा जप्त, ग्रामीण पोलिसांनी उधळला डाव

आमदार अपात्रता सुनावणी पुढील आठवड्यापासून

Back to top button