Dhangar reservation : .. तर राज्य सरकारला झळ सोसावी लागेल; जामखेडमध्ये चक्काजाम आंदोलन | पुढारी

Dhangar reservation : .. तर राज्य सरकारला झळ सोसावी लागेल; जामखेडमध्ये चक्काजाम आंदोलन

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : धनगर आरक्षणासाठी धनगर समाजबांधव चौंडी येथे उपोषणास बसले आहेत. मात्र, अकरा दिवस होऊनही राज्य सरकारने याची दखल घेतली नाही. उपोषणकर्त्यांच्या जीवाला काही झाले, तर याची झळ सरकारला सोसावी लागेल, अशा संतप्त भावना धनगर बांधवांनी व्यक्त केल्या. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, यासाठी चौंडी येथे उपोषण सुरू आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी धनगर आरक्षण कृती समिती व सर्वपक्षीयांतर्फे शहरातील खर्डा चौकात काल शनिवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेे.

यावेळी धनगर समाजबांधवांनी संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की, चौंडी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी यशवंत सेनेने उपोषण सुरू केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौंडीचा दौरा रद्द केला. मात्र, उपोषणस्थळी भेट देण्यासाठी त्यांना वेळ नाही.त्यामुळे सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.

धनगर व धनगड हे एकच आहेत. भाजप विरोधी पक्ष असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यावर त्यांना आश्वासनाचा विसर पडला. धनगर समाजाला मतदानाच्यादिवशी आरक्षणाचे गाजर दाखविण्याचे काम नेतेमंडळी करीत आहेत. मात्र, आता आरक्षण देणार्‍यालाच मतदान करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. धनगर आरक्षण मिळाले नाही, तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, समाजाची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत धनगर समाज शांत बसणार नाही.

धनगर आरक्षण कृती समितीचे विकास मासाळ, मोहन गडदे, महारुद्र महानवर, वैजीनाथ पोले, डॉ. कारंडे, चिलगर मेजर, मोहन देवकाते, अ‍ॅड. संग्राम पोले, डॉ. कैलास हजारे. रंजित कारंडे, राजेंद्र मासाळ, गणेश सूळ, बबन देवकाते, नवनाथ महाराज कोळेकर, आनंद खरात, अनिल श्रीरामे, देवीदास गोरे आंदोलनात सहभागी झाले होते. प्रा. मधुकर राळेभात, अ‍ॅड अरुण जाधव, मंगेश आजबे, रमेश आजबे यावेळी उपस्थित होते. जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे व पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा

अहमदनगर : महिलेवर पेट्रोल ओतून ठार मारले; दोघांना जन्पठेपेची शिक्षा

मंत्र्याने केली रामचरितमानसची तुलना पोटॅशियम सायनाईडशी

नदीजोड प्रकल्पासाठी 14 हजार कोटी मंजूर

Back to top button