

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाने नामदार गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) हॉटेल वैशालीसह आणखी एका हॉटेलवर कारवाई करून विनापरवाना शेड आणि अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला. इमारतीच्या साईड, बॅक मार्जिन मध्ये शेड, मंडप उभारून हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालविला जात आहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास महापालिकेच्या बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून केवळ शिवाजीनगर विभागात जोरदार कारवाई केली जात आहे. बांधकाम विभागाने बुधवारी गोखले रस्त्यावरील हॉटेल वैशाली तसेच क्वीन्स शॉप स्टोरी याठिकाणी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 3500 चौरस फूट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या मध्ये बांबू, पत्रा, लोखंडी अँगल, ओनिग ईच्या साहाय्याने बांधलेल्या शेड आदींचा समावेश आहे.
वैशाली हॉटेल मधील टेरेस आणि सामासिक अंतरातील सर्व विनापरवाना शेड काढण्यात आल्या. यावेळी हलवता येणारे ओनिग शेडही गॅस कटरने कापून काढण्यात आले. ही कारवाई कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, कनिष्ठ अभियंता समिर गढई यांनी, एक गॅस कटर घरपाडी विभागाकडील 10 बिगारी, एक पोलिस गट आदींच्या पथकाने केली.
हेही वाचा