Ganeshotsav in Pakistan : पाकमध्येही सुखकर्ता.. दु:खहर्ताचा जयघोष | पुढारी

Ganeshotsav in Pakistan : पाकमध्येही सुखकर्ता.. दु:खहर्ताचा जयघोष

विजय लाड

मुंबई : (Ganeshotsav in Pakistan ) मराठी माणसाचे गणेशोत्सवाशी अगदी अतुट नाते आहे. मराठी माणूस जाईल तेथे आपली संस्कृती, रुढी-परंपरा आणि सर्वात खास म्हणजे गणेशोत्सव घेऊन जातो. शेकडो वर्षांपूर्वी कराचीत स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबांमध्ये यंदाही गणेशोत्सवाचा जल्लोष दिसून येतो.

स्वातंत्र्यपूर्व काळात कोकणी माणूस नोकरी-धंद्यासाठी मुंबई आणि कराची या दोन शहरांमध्ये जायचा. इंग्रजांचे राज्य असताना कराची हे शहर भारतात होते. या काळात ही दोन शहरे भरभराटीला आली होती. समुद्राला जोडली गेली असल्याने येथील उद्योग, व्यापार वाढत होता. इतर शहरांमधील लोक या दोन शहरांमध्ये स्थायिक होत होते. अरबी महासागराने कोकण किनारपट्टीला जोडले गेले असल्याने कोकणातील लोकांना या दोन शहरांमध्ये जाणे सहज शक्य होते. त्यामुळे कोकणी माणूस जसा मुंबईत स्थायिक होत होता तसाच कराचीतही जात होता. फाळणीनंतर यातील अनेक कुटुंबे कराचीत स्थायिक झाली. त्यांनी गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. (Ganeshotsav in Pakistan )

दरवर्षी कराचीतील मराठी कुटुंब गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करतात. याची सुरुवात गणेशमूर्ती तयार करण्यापासून होते. पाकिस्तानात गणेशमूर्ती मिळणे जरा अवघड आहे. त्यामुळे मराठी कुटुंब स्वतःच गणेशमूर्ती तयार करतात. या मूर्तींची कराचीतील क्लिफ्टॉन या भागात असलेल्या श्री रत्नेश्वर महादेव मंदिरात, गणेश मठ मंदिरात विधिवत प्रतिष्ठापना केली जाते. दहा दिवस प्रवचन, भजन, कीर्तन यांसारखे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याबाबत कराचीतील राजेश नाईक म्हणाले की, फाळणीपूर्वी माझे वडील कृष्णा नारायण नाईक कराचीत आले. त्यांनी येथे गणपतीची मूर्ती घडवली. त्यापूर्वी कराचीत गणेशोत्सव साजरा होत नव्हता. माझ्या वडिलांनी याची सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो.

पाकिस्तानातील मराठी सामाजिक कार्यकर्ते विशाल राजपूत यांनी सांगितले की, कराचीतील पंजाब कॉलनी, सदर, केंट, डोली खाता, सोल्जर बजार, गिजरी आदी भागांमध्ये सुमारे 500 पेक्षा जास्त मराठी कुटुंब राहतात. केवळ मराठी कुटुंबांमध्ये नव्हे, तर पाकिस्तानातील इतर हिंदू समाजातही गणेशोत्सव साजरा केला जातो. (Ganeshotsav in Pakistan )

Back to top button