बारामती : नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा | पुढारी

बारामती : नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  महिलेच्या प्रसूतीवेळी डॉक्टर उपस्थित राहिले नाहीत. परिणामी, नवजात बालक मृत पावले. याप्रकरणी नेमलेल्या शासकीय समितीने डॉक्टरांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवल्यानंतर शहर पोलिसांनी येथील तुषार रामचंद्र गदादे या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला. दि. 22 डिसेंबर 2022 रोजी बारामतीत ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण मोरे यांनी फिर्याद दिली. यासंबंधी यापूर्वी नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद शहर पोलिस ठाण्यात होती. या बालकाची आई डॉ. गदादे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होती.

तिला डॉक्टरांनी प्रसूतीसाठी दाखल करून घेतले. त्या वेळी सीझर करावे लागेल, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर डॉक्टरांनी तेथे उपस्थित राहणे अपेक्षित असताना ते बाहेर गेले. दरम्यान, रुग्ण महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्या. बाळाचे पाय बाहेर आले. परंतु, गुदमरून बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टर आले. डॉक्टर उपस्थित असते तर बालकाचा मृत्यू झाला नसता, अशी तक्रार महिलेच्या नातेवाइकांनी केली होती. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्याकडे अहवालाची मागणी करण्यात आली होती.
चौकशी समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी या प्रकरणाची चौकशी करीत 30 ऑगस्ट रोजी अहवाल दिला. त्यामध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा याला कारणीभूत असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार पोलिसांनी डॉक्टरविरोधात भादंवि कलम 304 (अ) नुसार गुन्हा दाखल केला.

हेही वाचा :

Back to top button