Pune news : वातुंडे येथे 4 पिस्तुले, 8 काडतुसे जप्त | पुढारी

Pune news : वातुंडे येथे 4 पिस्तुले, 8 काडतुसे जप्त

पौड : पुढारी वृत्तसेवा :  मुळशी तालुक्यातील वातुंडे गावातील हॉटेल व्यावसायिक व कामगाराजवळ अवैध गावठी पिस्तुले आणि काडतुसाचा साठा पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळून आला आहे. यामध्ये दोघांकडे प्रत्येकी दोन अशी एकूण चार गावठी पिस्तुले, आठ जिवंत काडतुसे, मोबाईल, असा एकूण 2 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवैध अग्निशस्त्र बाळगणारे व विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी दिलेले आहेत.

संबंधित बातम्या :

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तपास पथकाला मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना दिल्या होता. तपास पथकातील पोलिस नाईक तुषार भोईटे यांना वातुंडे परिसरात बस थांब्याजवळ दोन जण उभे असून, त्यांचे जवळ गावठी पिस्तुले व काडतुसे आहेत, अशी खबर मिळाली. या वेळी गुन्हे शाखेचे पथकाने वातुंडे (ता. मुळशी) गावच्या हद्दीतील टेमघर धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावरील वातुंडे बसथांबा येथे अचानक छापा टाकून सागर मल्लेश व्हंदमुळे (वय 25, सध्या रा. वातुंडे, ता. मुळशी, मूळ रा. भोतेवस्ती, सूसगाव) आणि नीलेश अशोक चौगुले (वय 26, रा. टकसेन वस्ती, गणपती मंदिराजवळ सुसगाव) यांची अंगझडती घेतली असता, प्रत्येकी दोन असे एकूण चार गावठी पिस्तुले, आठ जिवंत काडतुसे, मोबाईल, असा एकूण 2 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, सहायक फौजदार हनुमंत पासलकर, पोलिस हवालदार सचिन घाडगे, राहुल घुबे, अतुल डेरे, राजू मोमीन, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, महेश बनकर, जनार्दन शेळके, तुषार भोईटे, मुकुंद कदम यांनी केली.

Back to top button