पुणे : पगारदार खातेदार ग्राहकांसाठी वैयक्तिक अपघात विमा; दिगंबर दुर्गाडे यांची माहिती | पुढारी

पुणे : पगारदार खातेदार ग्राहकांसाठी वैयक्तिक अपघात विमा; दिगंबर दुर्गाडे यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (पीडीसीसी बँक) पगारदार खातेदार ग्राहकांसाठी वैयक्तिक अपघात विमा कवच योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच युपीआय सुविधा (गुगल पे-फोन पे) ऑक्टोबर महिन्यात खातेदारांना उपलब्ध होणार आहे. बँकेच्या उत्कृष्ट कामकाज करणार्‍या शाखांनाही पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.

बँकेच्या पगारदार खातेदारांना वैयक्तिक अपघात विमा कवच योजनेत प्रामुख्याने पगारदार बिगर कर्जदार खातेदारांसाठी वर्षभर बचत खात्यात किमान 10 हजार रुपये शिल्लक असलेल्या पगारदार खातेदारांसाठी 10 लाख रुपयांचा वैयक्तिक विम्याचा संपूर्ण विमा हप्ता बँक भरेल. पगारदार खातेदाराला 10 लाखांपेक्षा जास्त रक्कमेचे विमा कवच हवे असल्यास दहा लाखांवरील व जास्तीत जास्त 30 लाखा विमा रक्कमेपर्यंतचा विमा हप्ता पगारदार खातेदाराने स्वतः भरावयाचा आहे.

तर पगारदार कर्जदार खातेदारांसाठी मासिक पगाराच्या 50 पट किंवा जास्तीत जास्त 30 लाख रक्कमेचा वैयक्तिक विमा हप्ता घेता येईल. कर्जदार पगारदार खातेदारांच्या विमा हप्त्यापोटी 25 टक्के रक्कम कर्जदार पगारदार खातेदार स्वतः भरेल व उर्वरीत 75 टक्के विमा हप्ता कर्जदाराच्यावतीने बँक भरेल. यासाठी मंजूर कर्जाच्या 25 टक्के रक्कम किंवा पाच लाख यापैकी कमाल कर्ज रक्कम किमान 120 दिवस उचल केलेली असावी.

बँकेच्या व्यवसाय वाढीच्यादृष्टीने सेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा, तालुका व शाखा स्तरावर उत्कृष्ट कामकाज करणार्‍या शाखांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमाकांचा पुरस्कार असून बँकेच्या 15 विभागांसाठी प्रत्येकी एक प्रथम क्रमांक पुरस्कार देण्यात येणार आहे. दरम्यान,केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती पुस्तिकाही ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामध्ये शेतीपुरक अनुदान योजनांची माहिती पुस्तिकेद्वारे तळागाळापर्यंत पोहचविण्याचा बँकेचा मानस असल्याचेही दुर्गाडे यांनी सांगितले.

हेही वाचा

पुणे : ‘एमआयटी एडीटी’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

पुणे जिल्ह्यात श्रमदानातून 300 बंधारे पूर्ण; दहा हजार वनराई बंधारे बांधणार

Nashik Ganeshotsav : निर्विघ्न गणेशोत्सवासाठी पोलिस सरसावले

Back to top button