ganeshotsav 2023 : गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया; भोसरी परिसरात ढोल-ताशांचा गजर | पुढारी

ganeshotsav 2023 : गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया; भोसरी परिसरात ढोल-ताशांचा गजर

हिंजवडी(पुणे) : आयटी परिसरात गणरायाचे मोठ्या थाटात आगमन झाले. गणरायाच्या स्वागतासाठी आरास, विद्युत रोषणाई, हार, फुले तसेच मूर्तीच्या खरेदीसाठी सकाळपासून परिसरातील दुकाने सजली होती. मंगळवारी सकाळपासून फुले आणि पूजेच्या साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होती. लहान-मोठ्या गणेशोत्सव मंडळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचीदेखील गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी लगबग दिसत होती. अखेर वरुण राजाच्या आगमनात थाटात गणेशमूर्तीची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली. आयटीतील अनेक इलेक्ट्रिक दुकाने मागील काही दिवसांपासून सजली होती. यात विविध प्रकारच्या विद्युत माळा यांसह विविध नावीन्यपूर्ण वस्तूंची रेलचेल होती. परिरात पूजेच्या साहित्यांची दुकानेदेखील गर्दीने फुल्ल होती.

भोसरी : गणपती बाप्पा मोरया… मंगल मूर्ती मोरयाचा जयघोष, वरुणराजाचा जलअभिषेक, पारंपरिक वाद्यासह ढोल-ताशा पथक, बँडपथकांचा निनाद. गणपतीच्या स्वागतासाठी सजलेली बाजारपेठ, मंगलारती, मंत्रपुष्पांजली अशा मंगलमय वातावरणात भोसरीत लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यात आले. घरोघरी व सार्वजनिक मंडळात ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

बाजारात मोठी गर्दी

भोसरी परिसरात लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी भोसरीकर सज्ज झाले होते. सकाळपासून गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुख्य बाजारात श्रींची मूर्ती तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भोसरीतील लांडेवाडी चौक, पीसीएमटी चौक आळंदी चौक, इंद्रायणीनगर चौक, पुणे-नाशिक महामार्ग आदी परिसरात भाविकांची गर्दी होती. श्रींची मूर्ती घेण्यासाठी बाजारपेठेत लगबग दिसून येत होती. बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती. बाजारपेठत श्रींचे मनोहर व विविध रूपातील गणेशमूर्तींना जास्त पसंती दिली जात होती. पसंद केलेली श्रींची मूर्ती कोणी वाजत-गाजत तर कोणी दुचाकीवर तर कोणी टेम्पोतून घेऊन जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.

सोसायट्यांमध्येही उत्साह शिगेला

डोक्यावर भगव्या टोप्या घातलेले गणेशभक्त गणरायचा जयघोष करत आपल्या घरी गणेशाची मूर्ती घेऊन जात होते. बाप्पाचा जयघोष, ढोल-ताशांच्या गजरात उत्साहाने घरोघरी, सोसायटी, शाळा तसेच सार्वजिनक गणेशोत्सव मंडळांमध्ये विधिवत ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली. परिसरातील सोसायटी, शाळा, कंपनी, ऑफिस तसेच सार्वजनिक मंडळाच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यासाठी दिवसभर लगभग दिसून येत होती. भोसरीतील प्रमुख मंडळांनी सायंकाळी पाचनंतर गणरायांचे विधिवत वाजत-गाजत प्रतिष्ठापना केली.

हेही वाचा

पिंपरी शहरातील लेबर कॅम्प गुन्हेगारांसाठी सुरक्षित अड्डे

बेळगाव : आता सीमावर्ती महाराष्ट्रातही मोफत प्रवास

पिंपरीत अनधिकृत बांधकामे; अतिक्रमण कारवाई कागदावरच

Back to top button