पिंपरी शहरातील लेबर कॅम्प गुन्हेगारांसाठी सुरक्षित अड्डे | पुढारी

पिंपरी शहरातील लेबर कॅम्प गुन्हेगारांसाठी सुरक्षित अड्डे

संतोष शिंदे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मोठ्या गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. मजुरांना राहण्यासाठी पत्रे ठोकून ठिकठिकाणी लेबर कॅम्प उभारले आहेत. मात्र, अलीकडे लेबर कॅम्पमध्ये खून, मारामार्‍या यासारखे गंभीर गुन्हे घडल्याचे समोर येऊ लागले आहे. मंगळवारी (दि. 19) दहशतवाद विरोधी पथकाने छापा मारून तीन संशयितांना अटक केली. तिघेही बनावट कागदपत्रांच्या आधारे कॅम्पमध्ये राहत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शहरातील लेबर कॅम्प परप्रांतातून आलेल्या गुन्हेगारांसाठी सुरक्षित अड्डे बनल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या :

पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. रोजगार मिळवण्यासाठी महाराष्ट्रातून तसेच राज्याबाहेरून आलेला मजूरवर्ग गुंठा किंवा अर्धा गुंठा जागा घेऊन शहरात स्थायिक झाला आहे. आजही अनेकजण कामाच्या शोधात शहरामध्ये दाखल होत आहेत. या येणार्‍या लोंढ्यांची कुठेही नोंद नसल्याने शहराच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहत आहे

भाडेकरूची माहिती पोलिसांना देण्याबाबत यापूर्वी अनेकदा आवाहन करण्यात आले. मात्र, तरी देखील घरमालक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पोलिसांनी काहीजणांवर कारवाई देखील केली. मात्र, अपुरे मनुष्यबळ, व्हीआयपींच्या दौर्‍यामुळे सतत लागणार बंदोबस्त, यामुळे पोलिसांनादेखील कारवाई करण्यात मर्यादा येत आहेत.

लेबर कॅम्पमध्ये राबवा नोंदणी मोहीम

शहरातील लेबर कॅम्पमध्ये नोंद नसलेले मजूर वास्तव्य करतात. यापूर्वी दारू पिताना झालेल्या वादातून खुनासारखे प्रकार लेबर कॅम्पमध्ये घडले आहेत. घटनेनंतर संबंधित आरोपीची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने पोलिस तपासात अडचणी येतात.

बिल्डर हात झटकून मोकळे

बांधकाम साईटवर एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतर सर्वप्रथम संबंधित बिल्डरकडे चौकशी केली जाते. मात्र, बहुतांश प्रकरणात कामगार पुरवण्यासाठीचा ठेका दिल्याचे सांगून बिल्डर हात झटकून मोकळे होतात. त्यामुळे पोलिसांनाही संबंधित बिल्डरला विचारणा करण्यास मर्यादा येतात. बिल्डरने ठेका दिलेल्या संबंधित ठेकेदाराने मजुरांच्या नोंदी ठेवणे कामगार कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, ठेकेदाराही मजुरांच्या कोणत्याही नोंदी ठेवत नसल्याचे कारवाईनंतर उघड होत आहे. ही बाब सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सांगवीतही सापडले होते परदेशी नागरिक

पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी स्थानिक पोलिसांची पथके भाडेकरूंच्या नोंदी तपासण्यासाठी हद्दीत फिरत होती. त्या वेळी सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही बांगलादेशी नागरिक मिळून आले होते. त्यांच्याकडेदेखील कागदपत्रे नसल्याचे पोलिस तपासात समोर आले होते.

हेही वाचा

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

Karnataka Politics : कर्नाटकात तीन उपमुख्यमंत्रिपदे !

Nashik Accident : गणेशमूर्ती घेऊन जाताना घडला अपघात, 6 जण जखमी

Back to top button