बेळगाव : आता सीमावर्ती महाराष्ट्रातही मोफत प्रवास | पुढारी

बेळगाव : आता सीमावर्ती महाराष्ट्रातही मोफत प्रवास

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  राज्य सरकारने महिला वर्गासाठी शक्ती योजनेंतर्गत राज्यभरात कोठेही मोफत प्रवास सुरू केला आहे. या योजनेला महिलांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. पण, सीमावर्ती भागात राहणाच्या महिलांना महाराष्ट्रात जाणाऱ्या कर्नाटक बसला ही सोय नव्हती. पण, आता वायव्य परिवहन मंडळाने कोल्हापूर, इचलकरंजी, मिरजपर्यंत म्हणजेच कर्नाटकाच्या हद्दीपासून वीस किलो मीटर अंतरापर्यंत या योजनेचा विस्तार केला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

काँग्रेसने सत्तेवर येण्यासाठी महिना मतदारांना मोफत बससेवेचे आश्वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मोफत प्रवासाला महिला वर्गाला मोठा प्रतिसाद लाभत आहे. त्याला खासगी वाहतूकदारांनी आक्षेप घेतला असला तरी सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. महिला वर्गातूनही आनंद व्यक्त करण्यात येत आहे. पण, ही योजना फक्त कर्नाटकपुरता मर्यादित होती. त्यामुळे सीमाभागात राहणाऱ्या महिला वर्गाला जवळच्या गावाला जाण्यासाठी पैसे द्यावे लागत होते. त्यामुळे सीमाभागातील गावांनाही या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी होत होती.. त्यानुसार सरकारने योजनेचा विस्तार केला आहे.

कर्नाटकाच्या रहिवाशी असलेल्या महिलांना आता सीमाभागात महाराष्ट्रातील २० किलो मीटर अंतरापर्यंत मोफत बस प्रवास करता येणार आहे. वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाने जाहीर केलेल्या यादीनुसार कर्नाटकाच्या बसमधून हुपरी, गडहिंग्लज, इचलकरंजी, मिरज, कोल्हापूर, नरसिंहवाडीपर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. ज्या महिला कर्नाटकाच्या रहिवासी आहेत. त्यांना आपले आधार कार्ड दाखवून शून्य रूपयांच्या तिकिटावर प्रवास करता येणार आहे.

कुद्रेमानी, धामणे, मरणहोण, बुगडीकट्टी ही गावे कर्नाटकात आहेत. या गावातील वायव्य परिवहनच्या बसमधून महिलांना मोफत प्रवास आहे. पण, या भागातून महाराष्ट्रात जाणाऱ्या कर्नाटकच्या बसमध्ये पैसे आकारण्यात येत होते. पण, आता या भागातून महाराष्ट्रात जाणाऱ्या बसमध्ये पैसे आकारण्यात येणार नाहीत. या विस्ताराबाबत दै. पुढारीने वायव्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रणाधिकारी गणेश राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, महिलांसाठी या योजनेचा विस्तार केला आहे. महाराष्ट्रातील १६ गावांसाठी ही सेवा देण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

या ठिकाणी झाला शक्ती योजनेचा विस्तार

हुपरी, गडहिंग्लज, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर, नृसिंहवाडी, गुड्यापूर, म्हाकवे, सिंदूर, हलकर्णी, सुंडी, कुद्रेमानी, बुगडीकट्टी, मरणहोळ, धामणे, तुडये.

 

Back to top button