पिंपरीत अनधिकृत बांधकामे; अतिक्रमण कारवाई कागदावरच | पुढारी

पिंपरीत अनधिकृत बांधकामे; अतिक्रमण कारवाई कागदावरच

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र अतिक्रमण होत आहे. तसेच, अनधिकृत बांधकामे सर्रासपणे सुरू आहेत. त्यामुळे शहर बकाल होत असून, अतिक्रमणामुळे वाहतूक रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. या अतिक्रमणावर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून धडक कारवाई करण्याची ग्वाही आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली होती. मात्र, वीस दिवस उलटूनही अद्याप ठोस कारवाई सुरू न झाल्याने आयुक्त राजकीय दबावाला बळी पडल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

शहरात सर्वत्र राजरोसपणे अनधिकृत बांधकामे होत आहेत. आरक्षित जागा, रेडझोन, निळी पूररेषा, ग्रीन झोन या भागांतही बेधडकपणे बांधकामे होत आहेत. केवळ दोन ते तीन महिन्यांत तीन ते चार मजली इमारती उभ्या राहत आहेत. कशाही प्रकारे बांधकाम केल्याने बकालपणा वाढत आहे. तसेच, रस्त्यांवर व मोकळ्या जागेत अनधिकृत पत्राशेड व टपर्यांचे अतिक्रमण वाढत आहे.

अनेक टपर्या व दुकाने तसेच, खाद्यपदार्थाचे स्टॉल थेट पदपथावर उभी करण्यात आली आहेत. दुकानदार व व्रिकेते पदपथावर माल ठेवून विक्री करतात. पदपथावर चालण्यास जागा मिळत नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे वाहतूक रहदारी संथ होऊन सातत्याने वाहतुकीचा प्रकार निर्माण होत आहे.

अतिक्रमणाबाबत जनसंवाद सभेत तक्रारी

शहर बकाल होऊन विद्रुप होऊ नये म्हणून तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी ठोस भूमिका घेतली होती. क्षेत्रीय कार्यालयानिहाय आठ धडक कारवाई पथके तयार केली होती. पोलिस व एमएसएफ जवानांच्या मदतीने धडक कारवाईचा धडाका लावण्यात आला होता. त्यांची 15 ऑगस्ट 2022 ला अचानक तडकाफडकी बदली झाली. ते गेल्यापासून धडक कारवाई मोहीम जवळजवळ ठप्पच झाली आहे.
त्यांच्या काळात झालेल्या कारवाईच्या ठिकाणी पुन्हा पत्राशेड, टपर्या व इमारती निर्माण झाल्या आहेत. या प्रकारात महापालिकेचे अधिकारी व बीट निरीक्षकही सामील असल्याचे आरोप सातत्याने होत आहे. तसेच, अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर नियमितपणे कारवाई करावी, अशी तक्रार सातत्याने जनसंवाद सभेत केली जात आहे.

राजकीय दबावामुळे कारवाई थंडावली

यासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून कारवाई सुरू करणार असल्याची ग्वाही दिली होती. मात्र, शहरात अद्याप कारवाई मोहीम सुरू करण्यात आलेली नाही. केवळ धूळखात पडलेल्या टपर्या आणि हातगाड्या उचलून कारवाई केल्याचा भास निर्माण केला जात आहे. राजकीय दबाव असल्याने आयुक्तांनी ठोस कारवाई मोहीम सुरू केली नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

धूळखात पडलेल्या टपर्‍या उचलण्यात महापालिकेचा जोश

महापालिकेचे पथक मोठा फौजफाटा घेऊन तुरळक कारवाई करीत आहे. शहरात अनेक ठिकाणी टपर्‍या ठेवण्यात आल्या आहेत. बंद अवस्थेतील धूळखात पडलेल्या टपर्‍या जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. तसेच, पदपथावर ठेवलेला भाजीपाला, कॅरेट, फलक, साहित्य व हातगाड्या जप्त केले जात आहे. विनापरवाना लावलेले फ्लेक्स व किऑक्स जप्त केले जात आहेत. मात्र, राजकीय नेत्यांच्या फ्लेक्सला हात लावला जात नाही. त्यामुळे ते फ्लेक्स अनेक दिवस चौकाचौकात दिसून येतात. तसेच, अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.

पदपथावरील अतिक्रमण हटविल्याचा दावा

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयानिहाय पथकांकडून 5 ते 15 सप्टेंबर या कालावधीत पथपदावर अतिक्रमण केलेले दुकानदार व विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. बहुतांश पदपथ रिकामे करण्यात आले आहेत. हॉकर्स झोनची जागा निश्चित करून तेथे विक्रेत्यांना स्थलांतरीत केले जाणार आहे. कारवाईसाठी 200 मजूर आणि 60 वाहनचालक कंत्राटी पद्धतीने घेत आहेत. मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर नियमितपणे कारवाई सुरू केली जाईल. तसेच, पूर्वीप्रमाणे मध्यवर्ती अतिक्रमणविरोधी पथक तयार केले जाणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.

हेही वाचा

पिंपरी शहरातील लेबर कॅम्प गुन्हेगारांसाठी सुरक्षित अड्डे

नगर झेडपीच्या रिक्त जागांसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा

Ambani Ganesh Chaturthi : २५ वर्षांच्या नव्या नंदासमोर ऐश्वर्या रायदेखील पडली मागे

Back to top button