मराठवाड्यात २१ ते २३ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता | पुढारी

मराठवाड्यात २१ ते २३ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पावसाने चार दिवसांपूर्वी दमदार हजेरी लावल्यानंतर आता २१ ते २३ सप्टेंबर या काळात मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० कि. मी. असल्याचेही म्हटले आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

गेल्या ८ ते १० सप्टेंबरदरम्यान पावसाने मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली. त्यानंतर दडी मारलेला पाऊस पुन्हा १५ सप्टेंबर रोजी बरसला. या काळात सूर्यदर्शनदेखील झाले नाही. मराठवाड्याच्या काही भागांत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. ८ ते १० सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसावर बळीराजाची पिके तग धरून होती. मात्र, आता या पिकांनीदेखील माना टाकायला सुरुवात केली आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये थोडाफार पाऊस पडला आहे, पण पुढील काळात धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यांमध्येदेखील पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

वेधशाळेचा अंदाज

२१ सप्टेंबर रोजी हिंगोली, परभणी व नांदेड या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. २२ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यात पाऊस होइल. तर २३ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० कि. मी. राहणार आहे.

Back to top button