पत्रकारांशी बोलण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रमातून काढता पाय | पुढारी

पत्रकारांशी बोलण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रमातून काढता पाय

 पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( पीडिसीसी बँक) 106 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे पुरस्कार वितरण करून बँकेचे संचालक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रम अर्धवट सोडला आणि पत्रकारांना चकवा देत सभागृहाच्या दुसऱ्या दरवाजाने निघून गेले. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या कार्यक्रमासाठी काढता पाय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कार्यक्रम अल्पबचत भवन येथे बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता सुरू झाला.

कार्यक्रमास राज्याचे सहकार मंत्री व बँकेचे संचालक दिलीप वळसे पाटील यांच्यासह उपाध्यक्ष सुनील चांदेरे, सर्व संचालक मंडळ, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्यासह जिल्ह्यातील विकास सोसायट्याचे सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवार यांचे भाषण संपल्यानंतर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विकास संस्थांचा जिल्हास्तर आणि तालुका स्तरावरील पुरस्कार वितरण सुरू झाले. महत्त्वाचे जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण होताच अजित पवार यांनी सभागृहाच्या उजव्या बाजूला थांबलेले पत्रकारांना चकवा देत डाव्या बाजूने पलायन करीत थेट गाडीत प्रवेश केला आणि कार्यक्रम स्थळावरून दुसऱ्या कार्यक्रमाला रवाना झाले.

त्यामुळे दोन दिवसांपूर्वी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारली होती आणि सोमवारी (दि.१८) जिल्हा बँकेचा कार्यक्रमाच्या त्यांचा नियोजित दौरा असूनही माहिती विभागाकडून तो कळविण्यात आलेला नव्हता. आजही त्यांना पत्रकारांकडून प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसून येताच सभागृहाच्या डाव्या बाजूने न बोलता जाणे पसंत केल्याचे दिसून आले. त्याची चर्चा कार्यक्रमस्थळी नंतर सुरू झाली होती. राहिलेले पुरस्कार वितरण सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडले.

हेही वाचा : 

Back to top button