अनोखी ‘पोलर रिंग’ आकाशगंगा | पुढारी

अनोखी ‘पोलर रिंग’ आकाशगंगा

वॉशिंग्टन : आकाशगंगा या अनेक आकारात पाहायला मिळत असतात. सावकाशपणे स्वतःभोवती फिरणार्‍या अंडाकृती आकाशगंगा तसेच वेगाने फिरत असलेल्या सर्पिलाकार आकाशगंगाही असतात. अनेक आकाशगंगा अतिशय मोठ्या आणि चमकदार असतात. त्यामध्येच आपली सौरमालिका असलेल्या ‘मिल्की वे’ या आकाशगंगेचा समावेश होतो. अशा आकाशगंगांभोवती आकाराने लहान असलेल्या आकाशगंगांचा समूह फिरत असतो. मात्र अशा विविध प्रकारच्या आकाशगंगांमध्ये अतिशय अनोखी व प्रेक्षणीय अशी आकाशगंगा खगोलशास्त्रज्ञांनी शोधली आहे. तिला ‘पोलर रिंग गॅलेक्सी’ असे म्हटले जात आहे. ही एक अत्यंत दुर्मीळ अशी सर्पिलाकार आकाशगंगा असून तिच्या ध-ुवांवर हायड्रोजन वायूची कडी फिरत आहे.

‘सीएसआयआरओ’च्या ऑस्ट्रेलियन स्क्वेअर किलोमीटर अ‍ॅरे पाथफायंडर (एएसकेएपी) रेडिओ टेलिस्कोपचा वापर करून या आकाशगंगेचा शोध लावण्यात आला. पश्चिम ऑस्ट्रेलियातील वाजारी यामाजी कंट्रीमध्ये हा रेडिओ टेलिस्कोप आहे. या आकाशगंगेला ‘एनजीसी 4632’ असे नाव आहे. तिच्यामध्ये हायड्रोजनची एक रिबनच फिरत असताना दिसून येते.

रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या ‘न्यू पेपर’मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली. ही आकाशगंगा अत्यंत दुर्मीळ अशा ‘पोलर रिंग गॅलेक्सी’ प्रकारातील आहे. या आकाशगंगेच्या तबकडीतील ध-ुवांमध्ये ही हायड्रोजनची कडी दिसून येते. या आकाशगंगेच्या एकूण वस्तुमानापैकी निम्मे याच वायूचे आहे. हा वायू सोबतच्या आकाशगंगेकडून खेचला जात असावा व त्यामुळेच ही कडी निर्माण झाली असावी, असे संशोधकांना वाटते.

संबंधित बातम्या

कॅनडातील क्वीन्स युनिव्हर्सिटीतील नाथन डेग यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितले की, या आकाशगंगा या सर्वाधिक प्रेक्षणीय असतात. त्या केवळ सुंदरच असतात असे नाही तर त्यांच्या निरीक्षणातून काळाच्या ओघात आकाशगंगांची निर्मिती व विकास कसा होतो हे समजू शकते. अशा आकाशगंगांमध्ये विशिष्ट असा थंड हायड्रोजन असतो. हा वायूच आकाशगंगेतील तार्‍यांच्या निर्मितीला चालना देतो.

Back to top button