मीटरनुसार भाडे परवडत नाही, बसा अन्यथा…

मीटरनुसार भाडे परवडत नाही, बसा अन्यथा…
Published on
Updated on

पिंपरी : अहो, दादा आकुर्डी रेल्वे स्टेशनपर्यंत मीटरने चला. त्यावर मीटरप्रमाणे परवडत नाही, साहेब! जायचे असेल तर दोनशे रुपये होतील. तर मीटरप्रमाणे होतील तेवढे घ्या ना तुम्ही, अशी आर्त विनवणी करूनही, येताना आम्हांला प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे मीटरपेक्षा चाळीस-पन्नास रुपये अधिक देणार असाल तर बसा, अन्यथा दुसर्‍या रिक्षाने जा. अशा प्रसंगांना शहरातील बर्‍याच नागरिकांना सर्रास सामोरे जावे लागत आहे.

रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास नकार देत असून, त्यामुळे अव्वाच्या सव्वा दर आकारत प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत आहेत. नागरिकांच्या तक्रारींचा पाढा ऐकून, दैनिक 'पुढारी'च्या प्रतिनिधीने पाहणी केली. त्या दरम्यान रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे नाकारल्याचे दिसून आले. मात्र, रिक्षाचालकाने भाडे नाकारणे हे बेकायदेशीर असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन दंड भरायची वेळ येऊ शकते. दरम्यान, मीटरप्रमाणे भाडे नाकारणार्‍या रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिला आहे.

औद्योगिक शहर असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाचालक जादा नफा मिळावा म्हणून पुण्यासारखे मीटरप्रमाणे धावत नाहीत. त्याऐवजी शेअरिंगनुसार धावत आहेत. तर मीटरपेक्षा शेअरिंगमध्ये प्रवास केल्याने कमी पैसे द्यावे लागतात. त्यामुळे काही प्रवाशांना शेअर अ‍ॅटोचा प्रवास सोयीचा वाटतो. मात्र, पाच ते सहा प्रवाशी कोंबून बसविल्याशिवाय रिक्षा धावत नसल्याने प्रवाशांना हा प्रवास करताना अवघडल्यासारखे वाटते. तर महिलांनाही गत्यंतर नसल्याने असा प्रवास करावा लागतो; परंतु हा ताप टाळावा, म्हणून बरेच प्रवाशी स्पेशल रिक्षा करून प्रवास करतात. यामध्ये काही प्रवाशी मीटरप्रमाणे भाडे देण्याचे ठरवतात; परंतु रिक्षाचालक त्यांना नकार देतात. वेळेवर पर्याय नसल्याने प्रवाशांना भाडे ठरवून द्यावे लागते. किंवा मीटरपेक्षा अधिक भाडे देण्याचे ठरवून पुढील प्रवास करावा लागतो.

तीस हजार रिक्षा मीटरविना

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नोंदणीनुसार पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 30 हजारहून अधिक अ‍ॅटोरिक्षा मीटरविना धावत आहेत. या सर्व शेअरिंग अथवा ओला, उबेर आणि रॅपिडो आदींसारख्या खासगी अ‍ॅपनुसार शहरात धावत आहेत.

मीटरप्रमाणे भाडे नाकारणे गुन्हा

प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे आकारण्याची मागणी केली तर मोटर वाहन कायद्यानुसार रिक्षाचालक हे भाडे नाकारू शकत नाही. रिक्षाचालकाने अशी कृती करणे बेकायदेशीर आहे. याबाबत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल होऊन, दंड भरावा लागू शकतो.

काय सांगतो कायदा?

मीटरनुसार भाडे नाकारणार्‍या रिक्षाचालकावर मो.वा.का. कलम 177 नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच 500 रुपये दंडाची पावती भरावी लागते.

कशी करणार तक्रार?

ज्या रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे नाकारले, अशा रिक्षाचालकांविरोधात शहरातील उपप्रादेशिक परिवहन विभागात जाऊन अथवा दूरध्वनी क्रमांक वा मेलद्वारे तक्रार करता येऊ शकते.

पिंपरी-चिंचवड शहरात शेअरिंग रिक्षा धावतात. ज्या प्रवाशांना मीटरनुसार प्रवास करायचा आहे, त्याबाबतची मागणी प्रवाशी रिक्षाचालकांना करू शकतात. मात्र, रिक्षाचालक यांस नकार देऊ शकत नाही. नकार दिला तर त्याबाबतची तक्रार प्रवाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात देऊ शकतात. त्यानुसार, चालकावर गुन्हा दाखल होऊ शकतो; तसेच दंडाची रक्कमही भरावी लागू शकते.

– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिं. चिं. शहर.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news