पुणे : ‘लव्ह लेटर’ पाठविणारे पोलिस तक्रारीच घेत नाही | पुढारी

पुणे : ‘लव्ह लेटर’ पाठविणारे पोलिस तक्रारीच घेत नाही

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रुफ टॉफ हॉटेलवरील कारवाई करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाला ‘लव्ह लेटर’ पाठविणारे पोलिस प्रशासन महापालिकेने दिलेल्या तक्रारी अर्जांची दखल न घेता आणि गुन्हे दाखल करत नसल्याची माहिती समोर आली आहे. अतिक्रमण, आरोग्य, आकाशचिन्ह अशा विविध विभागांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेल्या तक्रारी अर्ज पोलिस ठाण्यात धूळ खात आहेत.
रुफ टॉप हॉटेलवरील कारवाईसंदर्भात सध्या शहरात चर्चा सुरू आहे.

महापालिकेने संबंधित हॉटेलवर कारवाई करावी, असे पत्र पोलिस प्रशासनाने महापालिकेला दिले होते. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू असतात, त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. अनेकवेळा वादाचे प्रसंग घडतात, वाहने पार्क करण्यासाठी जागा मिळत नाही, असे मुद्दे मांडत पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा केला होता. रुफ टॉप हॉटेलवर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले होते.

वर्षभरापूर्वी दिले होते पत्र

महापालिकेने केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जावी, तसेच गुन्हे करणार्‍यांवर कारवाई व्हावी, यासाठी महापालिकेने जून 2022 मध्ये पोलिस सहआयुक्तांना महापालिकेच्या तक्रारींनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकार्‍याची नियुक्ती करावी, असे पत्र दिले होते. मात्र, त्यावर महापालिकेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

धोरण ठरविण्याची बैठक पुढे ढकलली

रुफ टॉप हॉटेल, अनधिकृतपणे साइड मार्जिनचा होणारा वापर यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पोलिस आयुक्त, उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गुरुवारी ही बैठक होणार होती, परंतु ती पुढे ढकलण्यात आली आहे.

महापालिकेची एनओसी गरजेची

हॉटेल व्यावसायिकांना महापालिकेकडून परवाना दिला जात नाही तसेच मद्यविक्रीचा परवाना उत्पादन शुल्क विभाग देते. यात महापालिकेची भूमिका ही इमारतीच्या आराखड्याशीच निगडीत असते. यामुळे अशा हॉटेलला परवानगी देताना महापालिकेची एनओसी घेणे बंधनकारक केले, तर अनधिकृत बांधकामाचा प्रश्न येणार नाही, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे.

हेही वाचा

Pune Crime News : संतापजनक! भीक मागण्यासाठी 2 हजारांत चिमुकलीचा सौदा

Pune News : महागड्या तपासण्या मोफत कधी ? गरीब रुग्णांचा सवाल

प्रवेशापासून नोकरीपर्यंत फक्त लागणार जन्माचा दाखला; केंद्राची अधिसूचना जारी

Back to top button