Pune Crime : महापालिकेत अधिकाऱ्यांची तुंबळ हाणामारी; परस्परांविरोधात तक्रार | पुढारी

Pune Crime : महापालिकेत अधिकाऱ्यांची तुंबळ हाणामारी; परस्परांविरोधात तक्रार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीवरून महापालिकेच्या अतिक्रमण विभागात अतिक्रमण निरीक्षक व माहिती अधिकार कार्यकर्ता यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी महापालिकेत घडली. याप्रकरणी दोघांनी परस्परांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महापालिका अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक निरीक्षकपदावर कंत्राटी पद्धतीने एकाला महापालिकेत कामाला घेण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी त्याचा कालावधी संपल्याने त्याला कामावरून काढण्यात आले होते. त्यानंतर ती व्यक्ती वारंवार माहिती अधिकाराचे अर्ज देत होती. तसेच वारंवार धमक्या देत होती. त्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागितली होती. त्यासाठी ती व्यक्ती बुधवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास महापालिकेतील अतिक्रमण विभागात आली.

या वेळी मागितलेली माहिती देण्यावरून तेथील सहायक अतिक्रमण निरीक्षक व विभागीय अतिक्रमण अधिकारी यांच्यासोबत वाद झाला. या वेळी त्या व्यक्तीने दालनातील खुर्ची उचलून सहायक अतिक्रमण निरीक्षकास मारली. तसेच फायटरने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी विभागीय अतिक्रमण अधिकार्‍यांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाही मारहाण केली. या मारहाणीत उचललेली खुर्ची टेबलवर पडल्याने टेबलवरील काच फुटली. दरम्यान, या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून परस्परांविरोधात मारहाण केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिसांत देण्यात आली आहे.

हेही वाचा

उत्कृष्ट मंडळ स्पर्धेसाठी असा करा ऑनलाइन अर्ज; उद्याचा शेवटचा दिवस

पुणे : बोगस 2742 प्रमाणपत्रे वाटणार्‍या मुख्य आरोपीचा जामीन फेटाळला

पुणे पोलिसांनी जप्त केलेले ५ कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट; गांजा, एमडी, कोकेन, चरसचा समावेश

Back to top button