पुणे; पुढारी वृत्तसेवा : केवळ महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल स्थापन करून नव्हे तर वेगवेगळे अकरा बोर्ड आणि विद्यापीठे स्थापन करून त्या माध्यमातून तब्बल 2 हजार 742 जणांना पैसे घेऊन बोगस प्रमाणपत्रे वाटली. याच गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा जामीन अर्ज ए. एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. सय्यद इम्रान सय्यद इब्राहीम (वय 35, नागसेन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) असे जामीन अर्ज फेटाळण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणात अलताफ अब्दुल शेख (29, रा. धाराशिव), संदीप ज्ञानदेव कांबळे (37, वाळवा, सांगली), कृष्णा सोनाजी गिरी (39, रा. संभाजीनगर), जमाल जगर शेख (36, चेंबूर, मुंबई), महेश उर्फ मुनीब दयाशंकर विश्वकर्मा (35, चांदीवली मुंबई), संदीपकुमार शमलाशंकर गुप्ता (33, रा. कुर्ला) यांनादेखील अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
गुन्ह्यातील म्होरक्या सय्यद इम्रान सय्यद इब्राहीम (वय-38, रा. संभाजीनगर) हा बोगस प्रमाणपत्र वाटपातील म्होरक्या आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या लॅपटॉप व मोबाईलमधून धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. तसेच महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल (एमएसआएस) च्या नावाने दहावी आणि बारावीची 741 प्रमाणपत्रे आर्थिक व्यवहार करून वाटली. अॅमडस विद्यापीठ संभाजीनगर नावाने बीएससी, बीकॉम, बीए ची 626 प्रमाणपत्रे, महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्नीकल एज्युकेशन एक्झामिनेशन (एमबीटीइइ) (आयआयटी) संभाजीनगर या विद्यापीठ स्थापन करून डिप्लोमा, आयटीआय, इंजिनिअररिंगची 630 प्रमाणपत्रे वाटली.
तर दहावी-बारावीकरिता त्याने बोर्ड ऑफ सेंकडरी एज्युकेशन मराठवाडा संभाजीनगर या बोर्डाच्या नावाने 733 प्रमाणपत्रे, महाराष्ट्र राज्य मुक्त विश्वविद्यालय संभाजीनगरच्या नावाने बीएससी, बीकॉम, बीए ची पाच तर अलहिंद युनिव्हर्सिटी संभाजीनगरच्या नावाने बी. एसएसी., बी. कॉम. आणि बी. ए.ची 4 बोगस प्रमाणेपत्रे पैसे घेऊन वाटल्याचा धक्कादायक प्रकार निष्पन्न झाला आहे.
मुख्य आरोपी सय्यद इब्राहिम याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्याला अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी विरोध करताना जामीन फेटाळण्याची मागणी केली. गुन्ह्याचा तपास अजून प्रगतिपथावर असून, इतर आरोपींनाही अटक करून त्यांच्याकडे तपास करणे बाकी आहे. याला जामीन दिल्यास तो साक्षी पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीचा जामीन फेटाळून लावला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगांवकर करीत आहेत.
हेही वाचा