अरे बापरे..! बनावट स्क्रीन शॉटद्वारे 400 जणांना फसवले | पुढारी

अरे बापरे..! बनावट स्क्रीन शॉटद्वारे 400 जणांना फसवले

पिंपरी : खरेदी केल्यानंतर यूपीआयद्वारे पेमेंट केल्याचा बनावट स्क्रीन शॉट दाखवून चारशे जणांना गंडा घालणार्‍या बंटी-बबलीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कामगिरी केली. गणेश शंकर बोरसे (34), प्रिया गणेश बोरसे (28. दोघे रा. काकडे यांची रुम, पठारे वस्ती, लोहगाव, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीपकुमार माली (रा. रहाटणी) यांनी तक्रार दिली होती की, एका दांपत्याने त्यांच्या कपड्याच्या दुकानात खरेदी केली. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करतो, असे सांगून खोटा स्क्रीन शॉट दाखवत त्यांची फसवणूक केली. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस शिपाई प्रशांत सैद यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीची ओळख पटवली.

मात्र, आरोपी हुशार होता. व्यावसायिकांना फसवल्यानंतर आरोपी मोबाईल स्विच ऑफ करीत असल्याने पोलिसांना अडचणी येत होत्या. तसेच, प्रत्येक वेळी आरोपी नवीन मोबाईल क्रमांकाचा वापर करीत होता. तो राहण्याचे ठिकाणही बदलत होता. दरम्यान, आरोपी रहाटणी, वाकड परिसरात फिरत असल्याची माहिती युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी अनेकांना गंडा घातल्याची कबुली दिली. ही कामगिरी उपायुक्त स्वप्ना गोरे, सहा.पो.आ. सतीश माने, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे, स.नि. सिद्धनाथ बाबर, उपनिरीक्षक गणेश रायकर, नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, अदिनाथ मिसाळ, आबासाहेब किरनाळे, प्रवीण दळे, तुषार शेटे, मोहम्मद नदाफ, रोहिदास आडे, वासुदेव मुडे, सुनील गुट्टे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद यांनी केली.

…अशी करायचे फसवणूक
आरोपी दुकानदाराशी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करीत होते. त्यानंतर जीवनावश्यक, मौजमजेच्या वस्तूंची खरेदी करायचे. खरेदीनंतर ऑनलाईन पेमेंट केल्याचे सांगून एका बँकेच्या बनावट अ‍ॅपचे स्क्रिन शॉट दुकानदाराला दाखवले जायचे. पेमेंट आले नसल्याने दुकानदाराने आरोपींना थांबवल्यास 24 तासांच्या आत पेमेंट येते, पेमेंट न आल्यास मला फोन करा, असे सांगून आरोपी स्वतःचा मोबाईल क्रमांक दुकानदारांना द्यायचे. आरोपी दुकानाबाहेर पडले की, लगेच दुकानदाराचा मोबाईल नंबर ब्लॉक लिस्ट केला जायचा व आरोपी मोबाईलमधून सिमकार्ड काढून नवीन नंबरचे सिमकार्ड घेत होते.

छोट्या मोठ्या दुकानदारांना गंडा
आरोपी गणेश हा हुशार आहे. पोलिसांकडून पकडले जाऊ नये, यासाठी त्याने पत्नीला मोबाईल वापरण्यास दिला नाही. तसेच, मोबाईलवरून एकही कॉल केला नाही. आरोपींनी पाणीपुरी, किराणा, मेडिकल, केक, मसाले, हार, गादी, सायकल, लॅपटॉप, इलेक्ट्रीक वस्तू, स्टेशनरी, गिफ्ट हाऊस, नर्सरी, अशा प्रकारचा व्यवसाय करणार्‍या 400 जणांना फसवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा :

Virat-Rohit 5000 Runs : 3 धावांवर बाद होऊनही कोहलीचा रोहितच्या साथीने ‘विराट’ विक्रम!

धुळे : प्रकाशा बुराई प्रकल्पाच्या मागणीसाठी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन

Back to top button