भोर : पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यात सकाळी कडक उन्हाचा तडाका, दुपारी रिमझिम पाऊस यामुळे वातावरणात वाढणारा उकाडा याचा परिणाम लहान- थोरांच्या प्रकृतीवर होत आहे. जुलाब, उलट्या, सर्दी, खोकला, पोटाचे विकार, ताप इत्यादी साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले असून, दवाखान्यांमध्ये रुग्णांची उपचारासाठी गर्दी होत आहे. मागील 15 ते 20 दिवसांपासून तालुक्यात पाऊस नसल्याने दिवसा उकाडा, तर रात्री वातावरणात गारवा लागत असल्याने लहान-थोर रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे.
मोठ्या पावसाची प्रतीक्षा असतानाच सध्या दोन दिवसांपासून तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू झाला असल्याने हवामान दूषित होत आहे. परिणामी, नागरिकांना साथीच्या आजारांना बळी पडावे लागत आहे. ग्रामीण भागात बहुतांशी खेडेगावांमध्ये ठिकठिकाणी पावसाचे पाणी खड्ड्यात साठल्याने, तर गटारे तुंबल्याने डासांची संख्या वाढली आहे. याचा लहान मुलांना, तसेच वृद्धा रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्यामध्ये बदल झाल्याने अनेकांना पोटाचे विकार झाले आहेत. गावोगावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तसेच सर्व सदस्यांनी गावांमध्ये तुंबलेली गटारे, तसेच खड्ड्यांमध्ये साठलेले पाणी यावर ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करून डासांचा नायनाट करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ताप, सर्दी, खोकला आल्यास डॉक्टरांना दाखवावे. पावसाळ्यात वातावरण दूषित होत असून, बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कर्हाळे यांनी केले आहे.
हेही वाचा :