Pune metro : पुणे मेट्रोचं काम जोमात! स्वारगेट ते शिवाजीनगर लवकरच धावणार मेट्रो

नियोजित स्वारगेट स्थानकाचे संकल्पचित्र.
नियोजित स्वारगेट स्थानकाचे संकल्पचित्र.

पुणे : स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे. ते पूर्ण करण्यासाठी मेट्रोकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, मंडई व बुधवार पेठ या भूमिगत मेट्रो स्थानकाअगोदर स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम अगोदर होईल, असा विश्वास मेट्रो अधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे स्वारगेट-शिवाजीनगर मेट्रो प्रवास लवकरच शक्य आहे. मेट्रोचा दुसरा टप्प्या नुकताच खुला करण्यात आला आहे.

मेट्रो प्रशासनाकडूनही पुढच्या दोन्ही टप्प्यांची कामे युध्दपातळीवर करण्यात येत आहेत. लवकरच रुबी हॉल स्थानक ते रामवाडी हा मेट्रोचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गावरील तीन भुयारी स्थानकांची कामे अजून बाकी आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी मेट्रोकडून तिन्ही स्थानकांची कामे एकाच वेळी सुरू आहेत.

मेट्रो स्वारगेट मेट्रो स्थानकाचे वरील दोन मजले बांधून देणार आहे. त्यानंतर वरील मजले पीपीपी तत्त्वावरील पार्टनर ते बांधेल, एकूण स्वारगेट स्थानकावर किती मजले आहेत, याबाबत आता सांगता येणार नाही. पीएमपीच्या 20 बस बसतील एवढ्या क्षमतेचे स्थानक आम्ही बांधणार आहे. एसटीची जागा अद्यापआम्हाला मिळाली नाही, असे सोनावणे यांनी सांगितले.

मल्टिमोडल हब होणार…

स्वारगेट हे ठिकाण शहराचा केंद्रबिंदू असून, त्याची पुण्याचे हृदय म्हणून ओळख आहे. या ठिकाणाहून दिवसभरात लाखो नागरिकांची आणि वाहनांची ये-जा असते. येथेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मोठे स्थानकदेखील आहे. या ठिकाणीच पीएमपीचेसुद्धा पूर्वी मोठे स्थानक होते. सध्या याच ठिकाणी मेट्रो स्थानक उभारण्यात येत आहे.

मात्र, तरीसुद्धा या ठिकाणाहूनच पीएमपीचे सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. या दोन्ही स्थानकांच्या जागांवर मेट्रो प्रशासनाकडून मेट्रोचे भव्य असे व्यावसायिक स्थानक -मल्टिमोडल हब उभारण्यात येत आहे. ते स्थानक भुयारी असून, वरचे इमारतीचे मजले व्यावसायिक वापरासाठी वापरण्यात येणार आहेत. त्याचे काम आता पूर्णत्वाकडे येत आहे.

भूमिगत स्थानकाची सद्यःस्थिती…

स्वारगेट स्थानकाचे भूमिगत काम सध्या 85 टक्के पूर्ण झाले असून, आता एलिव्हेटेड इमारत बांधकाम सुरू आहे. चार ते पाच मजल्यांपर्यंतचे एलिव्हेटेड काम पूर्ण होत असून, आगामी काळात लवकरच ते पुणेकरांसाठी खुले होईल.

स्थानकाविषयी…

  • पिंपरीकडून भूमिगत मार्गिकेतील शेवटचे स्थानक (भूमिगत)
  • स्थानकाची लांबी – 180 मीटर
  • स्थानकाची रुंदी – 24 मीटर
  • स्थानकाच्या वरील बाजूस एसटी, पीएमपीचे स्थानक
  • सायकल, रिक्षा, दुचाकी, पादचारी ट्रॅकची व्यवस्था
  • आठ सरकते जिने, लिफ्ट, वातानुकूलित स्थानक

स्वारगेट मेट्रो स्थानकासह मंडई, बुधवार पेठ मेट्रो स्थानकाचे कामसुद्धा वेगाने सुरू आहे. मात्र, या तिन्ही स्थानकांमध्ये स्वारगेट स्थानकाचे काम अगोदर पूर्ण होईल, असे दिसत आहे.

– हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक
तथा जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news