आळशी लोकांची स्पर्धा! | पुढारी

आळशी लोकांची स्पर्धा!

ब्रेजना : जगात आळशी लोकांची अजिबात कमी नाही. ‘आज करे सो कल कर, कल करेसो परसो, इतनी भी क्या जल्दी है, जब जीना है बरसो’, हाच अशा लोकांचा खाक्या असतो. अगदी रोजच्या कामातही अशा लोकांना मेहनत नको असते. अशाच लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जणू उत्तर माँटेनेग्रोमधील ब्रेजना या गावात चक्क आळशी लोकांची स्पर्धा सुरू आहे! या विचित्र वार्षिक स्पर्धेत सात स्पर्धक सर्वात आळशी व्यक्ती बनण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत आहेत!

आश्चर्य म्हणजे मागील सलग 20 दिवसांपासून हे स्पर्धक 1 हजार युरोचे अव्वल क्रमांकाचे बक्षीस जिंकण्यासाठी अविरतपणे मॅटवर पडून आहेत आणि एकेक दिवस मोजत आहेत. मागील वर्षातील 117 तासांचा विक्रम मोडीत काढण्याचे पहिले लक्ष्य या स्पर्धकांनी समोर ठेवले होते. आता एकेक मजल पार करत त्यांचा प्रवास पुढे सुरू आहे.

या स्पर्धेत सहभागी 23 वर्षीय स्पर्धक फिलीप कनेजेविक म्हणाला, इथे सारे काही आहे, हे आम्हाला हवे असते. सर्व स्पर्धकही सौहार्दाने राहतात. त्यामुळे, वेळ कसा निघून जातो कळत देखील नाही. फक्त ऊठबस करण्याबाबत किंवा उभे राहण्याबाबत काही नियम आहेत. आता प्रत्येकाला आठ तासांमधून एकदा 10 मिनिटांचा बाथरूम ब्रेक मिळतो.

सर्व स्पर्धकांना आहार, वाचन, मोबाईल, लॅपटॉप या सर्वांचा उपयोग करण्याची मुभा आहे. मात्र, ही सर्व कामे त्यांना पहुडत करायची आहेत. आश्चर्य म्हणजे ही स्पर्धा मागील 12 वर्षांनी नित्य नेमाने भरवली जाते. या स्पर्धेचे आयोजक रेडोंजा ब्लागोजेविक यांची मात्र यावरून प्रारंभी टर्र उडवली जात असे. मोंटेनिग्रोचे लोक खूपच आळशी आहेत, असे त्यावेळी म्हटले जात असे. यंदाची ही स्पर्धा 21 स्पर्धकांच्या माध्यमातून सुरू झाली होती. पण, आता केवळ 7 लोक बाकी राहिले आहेत. ब्लागोजेविक म्हणाले की, स्पर्धेत बाकी असलेले 7 स्पर्धक मागील 463 तासांपासून पहुडलेल्या अवस्थेत आहेत.

Back to top button