लोणावळ्यात घरफोडी करणारी टोळी जेरबंद | पुढारी

लोणावळ्यात घरफोडी करणारी टोळी जेरबंद

लोणावळा(पुणे) : लोणावळा शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात घरफोडी करणार्‍या तीन जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत 2 लाख 26 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींकडून आतापर्यंत लोणावळा शहर हद्दीत 9 तर ग्रामीण हद्दीत 1 अशा 10 घरफोडी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्ह्याची उकल करण्यासाठी पथक

वसीम सलाऊद्दीन चौधरी (वय 27, रा. वाकसई, वरसोली लोणावळा), सलीम सलाऊद्दीन चौधरी (वय 21) आणि शहारूख बाबू शेख (वय 21, दोघे रा. लोणावळा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लोणावळ्यात काही पर्यटकांची याठिकाणी स्वतःची घरे आहेत, तर काही पर्यटक भाडेतत्त्वावर घरे घेऊन राहतात. या पर्यटकांच्या तसेच स्थानिकांच्या घरामध्ये चोरी होत असल्याबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या.

त्याअनुषंगाने लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी लोणावळा उप विभागाची गुन्हे आढावा बैठक घेतली. तसेच, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले होते.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, प्रदीप चौधरी, प्रकाश वाघमारे, हवालदार राजू मोमीण, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, तुषार भोईटे, अमोल शेडगे, मंगेश भगत, प्राण येवले, काशिनाथ राजापूरे, शकील शेख यांनी केले आहे. या घटनेचा तपास लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ करत आहेत.

आरोपींनी चोर्‍या केल्याची दिली कबुली

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोणावळा परिसरात आपला वावर वाढवून सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच, गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास सुरू केला होता. उपलब्ध माहितीच्या आधारे सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम सलाऊद्दीन चौधरी हा करत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार, ताब्यात घेऊन तपास केला असता त्यानेच चोर्‍या केल्याची कबुली दिली. आरोपी वसीम हा उघड्या दरवाजावाटे किंवा स्लायडींग खिडकीद्वारे घरात प्रवेश करून घरातील रोख रकमेसह मौल्यवान वस्तूंची चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीचे काही गुन्हयात त्याचे साथीदार सलीम सलाऊद्दीन चौधरी आणि शाहरुख बाबू शेख यांचा सहभाग असल्याचे समोर आल्याने त्यांनाही अटक केली आहे.

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून दोन सोन्याची चेन, दोन डायमंडच्या अंगठ्या, एक सोन्याची अंगठी, दोन मोटारसायकल, रोख रक्कम असा एकूण 2 लाख 26 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी वसीम चौधरी हा सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे. इतर दोन आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपी वसीम चौधरी याच्यावर आठ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपींकडून एकूण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

लोणावळा परिसरात राहणारे नागरिक तसेच येणारे पर्यटकांनी रात्रीच्या वेळी तसेच फिरण्यासाठी बाहेर पडताना घरांचे दरवाजे खिडक्या व्यवस्थीत बंद कराव्यात. दरवाजा-खिडकी उघडे ठेवून झोपू नये. तसेच, स्लायडींग खिडक्यांना लोखंडी ग्रिल लावावेत, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.

– सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलिस अधिकारी

हेही वाचा

तळेगावमधील पाणीपुरवठा विस्कळीत

2700 वर्षांपूर्वीचा ‘तो’ माणूस भूकंपाचा बळी!

Leopard attack : अहमदनगरमध्ये बिबट्याचा थरार! श्रीगोंद्यातील महिलेवर हल्ला; प्रकृती चिंताजनक

Back to top button