

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आम्ही मराठा समाजाचे नेते मानत नाही. त्यांनी मराठा समाजाचे वाटोळे केले. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहत नाहीत. त्यांना घर टिकविता आले नाही. पक्ष टिकवता आला नाही, अशी टीका अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देणे मला पटत नाही, असे विधान शरद पवार यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना जावळे-पाटील बोलत होते. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील तेवढेच जबाबदार आहेत. मराठा समाजाचे वाटोळे करू नका, असे आवाहन मी त्यांना करेन.
येत्या 17 सप्टेंबरपर्यंत मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण द्यावे. अन्यथा, यापुढील काळात लढा आणखी तीव— केला जाईल, असे जावळे-पाटील यांनी नमूद केले. ते म्हणाले की, हा प्रश्न मार्गी न लागल्यास यापुढील काळात शांततेच्या मार्गाने आंदोलन होणार नाही, तर तलवार मोर्चा काढण्यात येईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत. मात्र, त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावला नाही तर मराठा समाज त्यांनाही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मंत्र्यांना करू देणार नाही, असेही जावळे-पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा