पुण्याच्या कारभारावर आता आरोग्यमंत्र्यांचेही लक्ष | पुढारी

पुण्याच्या कारभारावर आता आरोग्यमंत्र्यांचेही लक्ष

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्याच्या कारभारावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात शीतयुध्द पाहायला मिळत असतानाच आता शिंदे गटाचे नेते व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचीही त्यात भर पडली आहे. सावंत यांनी मेट्रो पार्किंग आणि शंकर महाराज मठ येथील अतिक्रमणासंदर्भात शुक्रवारी महापालिकेत येऊन दोन्ही प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

पुण्याच्या कारभारामध्ये पहिल्यापासूनच अजित पवार हे सक्रिय आहेत. त्यांनी बरीच वर्षे पुण्याचे पालकमंत्रिपद भूषविले आहे. सध्या पुण्याचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्यामध्ये खटके उडत आहेत. पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पवार यांची तक्रारी केली आहे. यानंतर आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत हेसुद्धा पुण्यातील प्रश्नांमध्ये लक्ष देऊ लागले आहेत. सावंत परांडा मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र, त्यांचे शैक्षणिक साम—ाज्य पुणे आणि परिसरामध्ये आहे.

विविध प्रश्नांसंदर्भात सावंत जागरुक

शहरामध्ये वास्तव्यास असणारे सावंत पुण्यातील विविध प्रश्नांसंदर्भात जागरुक असतात. शहरामध्ये मेट्रो सेवा सुरू झाली. मात्र, कोणत्याच मेट्रो स्थानकाला पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात त्यांनी हा प्रश्न सोडण्यासाठी नदीपात्रामध्ये
पूररेषेच्यावर वाहनतळ करता येऊ शकतात. त्यादृष्टीने पाहणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

तसेच धनकवडी भागातील शंकर महाराज मठ या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर संस्थेला मोठे प्रवेशव्दार करावयाचे आहे. यासाठी येणार्‍या अडचणी तत्काळ सोडवण्याच्याही सूचना सावंत यांनी केली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा

राजकीय पक्षांची ‘दुबार’ पेरणी

पुणे : कलाकार कट्ट्यावरील अतिक्रमण हटविले; महापालिका प्रशासनाची कारवाई

पैठण : नाथसागर धरणात पाण्याची आवक सुरू; १० हजार क्युसेक पाणी जमा होणार

Back to top button