

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पत्र्याच्या शेडमध्ये विजेचा करंट उतरल्याने त्याचा धक्का लागून आठ व सहा वर्षांच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. शौर्य पोटफोडे (वय 8) व कान्हा पोटफोडे (वय 6) अशी मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. याप्रकरणी, बांधकाम साइटवरील ठेकेदार धरू काळे (रा. नर्हे, आंबेगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, मुलांच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कामाच्या निमित्ताने मुंढवा परिसरात डेव्हलपमेंट बिल्डिंगसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती.
30 जून रोजी काळे यांनी बिल्डिंगमधील लाईट मीटरमधून जुन्या केबलच्या आधारे तिला शेडमध्ये लाईट लावून दिली होती. सदर पत्र्याच्या शेडमध्ये लाईट लावताना कोणतीही खबरदारी न घेतल्याने त्याच्या हलगर्जीपणामुळेपित्र्याच्या शेडमध्ये विजेचा करंट उतरून शॉक लागून महिलेची दोन्ही मुले शॉक लागून जागीच मरण पावली. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात अकस्मात मयत गुन्हा सुरुवातीला दाखल करण्यात आला होता. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आणि महिलेने तक्रार दिल्यावर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक एस. भोसले करत आहेत.
हेही वाचा