पुणे : धर्मादाय आयुक्तालयाकडून रुबी हॉल रुग्णालयाला नोटीस | पुढारी

पुणे : धर्मादाय आयुक्तालयाकडून रुबी हॉल रुग्णालयाला नोटीस

पुणे : ऑडिट रिपोर्ट, विश्वस्त संस्थेचे बँक स्टेटमेंट आणि प्रत्यक्ष उत्पन्न, यामध्ये तफावत आढळल्याने धर्मादाय आयुक्तालयातर्फे रुबी हॉल क्लिनिकला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. गरीब रुग्ण निधीचा योग्य वापर न केल्याचा उल्लेखही नोटीसमध्ये केला आहे. धर्मादाय आयुक्तांनी 1 सप्टेंबर रोजी ग्रँट मेडिकल फाउंडेशन ट्रस्टला इंडिजेंट पेशंट्स फंड (गरीब रुग्ण निधी) खात्यातील कथित तफावतींवरून कारणे दाखवा नोटीस बजावली.

आयपीएफ खात्यातील निधीतील अनियमितता ऑगस्टमध्ये रेकॉर्डच्या तपासणीदरम्यान आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. दर तीन महिन्यांनी केलेल्या नियमित तपासणीदरम्यान आयपीएफ खात्यात तफावत आढळून आली. यानंतर हॉस्पिटलला 2019 पासूनचे ऑडिट रिपोर्ट, बँक खाते स्टेटमेंट आणि आयपीएफ स्टेटमेंटचे तपशील सादर करण्यास सांगण्यात आले.

हॉस्पिटल ट्रस्टने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये 2019 पासूनच्या नोंदींमध्ये अनियमितता आढळून आली आहे. निष्पक्ष आणि न्याय्य चौकशीसाठी त्यांना संधी देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात याबाबत सुनावणी होणार आहे. त्यांच्याकडून स्पष्टीकरण सादर झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

– सुधीरकुमार बुक्के, सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग

धर्मादाय आयुक्तालयाकडून पाठविण्यात आलेली नोटीस मिळाली आहे. आयपीएफ अकाउंट नियमानुसार मेंटेन केले आहे. इन्स्पेक्टरने सांगितल्याप्रमाणे बदलही केले आहेत. सर्व कागदपत्रे संकलित करून कायदेशीर नोटिशीला रीतसर उत्तर दिले जाईल.

– अ‍ॅड. मंजूषा कुलकर्णी, कायदेशीर सल्लागार, रुबी हॉल क्लिनिक

हेही वाचा

पुणे : पांगुळ आळीत लोखंडी सांगाडा कोसळला; मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

सोलापूर : पालकमंत्री विखे-पाटील यांच्यावर फेकला भंडारा

लवंगी मिरची : आवाज आणि पेमेंट!

Back to top button