

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तीन श्वानांना प्लास्टिकच्या पिशवीत घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. 3) सायंकाळी सातच्या सुमारास संकल्पनगरी, देहूरोड येथे घडली. पीयूष हरिशकुमार चतुर्वेदी (29, रा. भूमकर चौक, ताथवडे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देहूरोड येथील बँक ऑफ इंडियाजवळ असलेल्या संकल्पनगरी येथे तीन श्वानांना प्लास्टिकच्या पिशवीत घातले असल्याची माहिती फिर्यादी चतुर्वेदी यांना मिळाली. त्या वेळी त्यांनी धाव घेत पाहणी केली असता श्वानांचे तोंड कापडी टेपणे, पाय दोरीने बांधले होते.
अतिशय क्रूरपणे तीन श्वानांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधून शांत केले होते. श्वानांना ठार मारण्याच्या अथवा अपंग करण्याच्या उद्देशाने आरोपींनी हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 429, 511 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :