शस्त्र परवाना कसा काढतात, कशी आहे प्रकिया; घ्या जाणून? | पुढारी

शस्त्र परवाना कसा काढतात, कशी आहे प्रकिया; घ्या जाणून?

समीर सय्यद

पुणे : शस्त्र परवाना काढण्यासाठी ठरावीक नमुन्यातील अर्ज भरून तो पोलिस आयुक्त कार्यालयात किंवा पोलिस आयुक्तालय नसलेल्या ठिकाणी वास्तव्य असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत दाखल करावा लागतो. केवळ दोनच कारणांसाठी शस्त्र परवाना दिला जातो. आत्मसरंक्षण आणि शेती पीकरक्षण, या कारणांसाठी शस्त्र परवाना देण्यात येतो.

कोणकोणती कागदपत्रे लागतात?

शस्त्र परवान्यासाठी आपल्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो. आपले पासपोर्ट साइज फोटो, मतदान ओळखपत्र, मागच्या तीन वर्षांतील इन्कम टॅक्स रिटर्न तसेच आपण कोणती गन घेणार आहोत, त्याचीही माहिती द्यावी लागते. दोन व्यक्तींकडून चारित्र्य प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्म प्रमाणपत्र आणि आपण ज्या कारणासाठी शस्त्र बाळगू इच्छिता, त्याचे समर्पक कारण द्यावे लागते. तसेच, हे शस्त्र बाळगण्याची आवश्यकता असल्याचे पटवून द्यावे लागते.

तीन शस्त्रे वापरण्याची मिळते परवानगी

सरकारच्या नियमांनुसार आपल्या देशात तीन प्रकारच्या शस्त्रांसाठी आपण अर्ज करू शकता. शॉटगन, हँडगन आणि स्पोर्टगन या तीन प्रकारच्या गनसाठी परवाना मिळतो.

…तरच शस्त्र परवाना मिळतो

शस्त्र परवान्यासाठी विविध नमुन्यांत अर्ज भरून त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून परवाना जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा लागतो. शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराची गुन्हेगारी नोंद आहे का? ते तपासले जाते. पत्त्याची पडताळणी केली जाते आणि त्या व्यक्तीशी संबंधित सर्व माहिती गोळा केली जाते. त्यानंतर अर्जदाराची मुलाखतही घेतली जाते. मुलाखतीत अर्जदाराला बंदूक का बाळगायची आहे? असा प्रश्न विचारला जातो. मुलाखतीनंतर अर्जदाराचा अहवाल गुन्हे शाखा आणि नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडे पाठविला जातो. जर या दोन्ही ठिकाणांहून कोणताही आक्षेप आला नाही आणि पोलिस अधिकारीदेखील अर्जदाराच्या कागदपत्रांसह आणि संबंधित तपासणीवर समाधानी असतील, तर अर्जदाराला बंदुकीचा परवाना दिला जातो.

हेही वाचा

उत्तर पुणे जिल्ह्यावर दुष्काळाची टांगती तलवार ! बळीराजाचे डोळे अद्यापही आकाशाकडेच

Nashik: म्हसरुळ, पंचवटी, हिरावाडीत शनिवारी पाणीपुरवठा बंद

Pune Crime news : पुणं पुन्हा हादरलं; आईच ठरली वैरी! पोटच्या मुलीचा केला खून; दोन बहिणींच्या वादात एकीचा घेतला जीव

Back to top button