Swiggy Company : पुण्यातील संतापजनक घटना; डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग
पुणे; पुढारी वृत्तसेवा : सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने तरुणीला मोबाईल चार्जिंग करण्याचा बहाणा करून तिला शरीरसुखाची मागणी करीत अश्लील हावभाव केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित स्विगी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाकडेवाडी येथील 26 वर्षीय तरुणीने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने स्विगी या ऑनलाइन अॅपवरून घरगुती सामान मागवले होते. त्यातील वस्तू तपासत असताना तिला सॅनिटरी पॅडचे पॅकिंग फोडलेले दिसल्याने त्यांनी स्विगीला याबाबत तक्रार केली. तिने मोबाईवरून फाटलेल्या सॅनटरी पॅडचा फोटो पाठविला. त्यानंतर नवीन डिलिव्हरी बॉय नवीन सॅनिटरी नॅपकीनचे पॅकेट घेऊन आला.
त्याने तरुणीला मोबाईल डिस्चार्ज होत असल्याचे कारण सांगून मोबाईल चार्जिंग करण्याच्या बहाण्याने घरात शिरला. या वेळी तरुणीला अश्लील हावभाव करून त्याने तिला शरीरसुखाची मागणी केली. तिने याबाबत खडकी पोलिस ठाण्यात धाव घेऊन डिलिव्हरी बॉयविरोधात तक्रार दिली. पुढील तपास खडकी पोलिस करत आहेत.
हेही वाचा

