पिंपरी : लालपरी मालवाहतुकीतही ठरतेय भारी ; गेल्या आठ महिन्यांत सोळा लाखांहून अधिक उत्पन्न

पिंपरी : लालपरी मालवाहतुकीतही ठरतेय भारी ;  गेल्या आठ महिन्यांत सोळा लाखांहून अधिक उत्पन्न

पिंपरी : शहरात नागरिकांना मालवाहतुकीची सेवा देण्यासाठी अनेक कंपन्या कार्यरत असून, त्यांमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या स्पर्धेत एसटीची मालवाहतूक सेवा चोख वेळेत, स्वस्त दरात आणि सुरक्षित सेवा देत असल्याने खासगी कंपन्यांपेक्षा भारी ठरली आहे. गेल्या आठ महिन्यांत मालवाहतुकीमधून एसटीला 16 लाख 20 हजार 976 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तोट्यात असलेल्या महामंडळापैकी एक असलेले राज्य परिवहन महामंडळ, आता वेगवेगळ्या योजनांद्वारे सर्वसामान्यांच्या घराघरापर्यंत पोहोचत, जनतेच्या मनात घर करू लागले आहे.

उपलब्ध खासगी सेवेहून अधिक तत्पर, सुरक्षित आणि माफक दरांमुळे मालवाहतूक सेवा सध्या चर्चेत आहे. या वर्षातील पहिल्या आठ महिन्यांत एसटीच्या मालवाहतूक सेवेने 22 हजार 165 किलोमीटरचे अंतर पार करत, 109 फेर्‍यांमधून 16 लाखांहून अधिक उत्पन्न मिळविले आहे.

एस.टी. द्वारे या मालाची वाहतूक :
बालभारतीची पुस्तके राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचविणे, औद्योगिक नगरीतील कंपन्यांचे साहित्य, घरसामान, सिमेंट आदींची वाहतूक एसटीद्वारे केली जात आहे. याबरोबरच विविध साहित्यांची वाहतूक करण्यासाठी एस.टी. मालवाहतूक सेवा तत्पर आहे.

एप्रिल महिन्यात सर्वाधिक उत्पन्न :
राज्यातील शाळा जून महिन्यात सुरू होत असतात. एप्रिल महिन्यापासूनच बालभारती प्रकाशनाची पुस्तके शाळांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू होते. राज्याच्या कानाकोपर्‍यांपर्यंत ही पुस्तके एसटीद्वारेच पोहोचविली जातात. एप्रिल महिन्यात पहिल्या टप्प्यातील पुस्तकांची वाहतूक केली गेली. यामधून एसटीच्या उत्पन्नात 6 लाख 41 हजार 12 रुपयांचे उत्पन्नाची भर पडली आहे.

एसटीला मिळणार्‍या इतर उत्पन्नापैकी सर्वाधिक उत्पन्न हे माल वाहतुकीमधून प्राप्त होत आहे. घरसामान आणि इतर साहित्यांची वाहतूक वाढली असून, राज्यभरात बालभारती पुस्तकांची वाहतूक एसटीनेच होत आहे. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळत आहे. खासगी सेवांपेक्षा अधिक तत्पर, सुरक्षित आणि माफक दरामुळे एसटीच्या मालवाहतूक सेवेला नागरिक प्राधान्य देत आहेत. शहरामधून खासगीच्या तुलनेत एसटीची मालवाहतूक सेवा सर्वश्रेष्ठ ठरत आहे.
              – विकास तुळे, मालवाहतूक प्रमुख, वल्लभनगर आगार, पिं. चिं. शहर. 

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news