पिंपरी : पदपथांसाठी वारेमाप खर्च; तरीही पादचारी रस्त्यावरच

पिंपरी : पदपथांसाठी वारेमाप खर्च; तरीही पादचारी रस्त्यावरच

पिंपरी : शहरातील सुस्थितीतील रस्ते तोडून प्रशस्त पदपथ व सायकल ट्रॅक निर्माण केले जात आहेत. त्याकरिता कोट्यवधींचा वारेमाप खर्च केला जात आहे. ते पदपथ विक्रेते व दुकानदारांच्या साहित्यांनी व्यापलेले आहेत. तसेच, एकसलग पदपथ नसल्याने, त्यावर विविध अडथळ्यामुळे पादचार्‍यांना नाईलाजास्तव रस्त्यावरून चालावे लागते. उद्देश सफल होत नसल्याने केवळ मोठ्या खर्चासाठीच असे प्रकल्प हाती घेतले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

जगातील मेट्रो सिटीत असलेल्या रस्त्यांप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिका शहरात रस्ते व पदपथ विकसित करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी चांगले व सुस्थितीतील रस्ते तोडून नव्याने तयार केले जात आहेत. तसेच, अधिक रुंदीचे पदपथ बनवून सायकल ट्रॅकची भर घातली जात आहे. मात्र, हे पदपथ व सायकल ट्रॅक एक सलग नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
ड्रेनेजचे झाकण, बोल्हार्डचा अडथळा, पदपथावर झाड, वीजेचा खांब, डीपी बॉक्स, बाक, कठडा, नामफलक असे अडथळे पार करीत ये-जा करताना अक्षरश: अडथळ्यांची शर्यत करावी लागते. तसेच, बहुसंख्य पदपथावर दुकानदार, विक्रेते व वाहनचालक अतिक्रमण करतात. विक्रेते व दुकानदार त्यांचे साहित्य पदपथावर मांडतात.

अनेक वाहने थेट पदपथावर पार्क केलेली असतात. नागरिकांना नाईलाजास्तव रस्त्यावरून चालावे लागते. इतका मोठा खर्च करूनही पादचार्यांना पदपथावरून सुरक्षितपणे चालता येत नसल्याचे चित्र शहरात आहे. त्यावरून कोट्यवधीचा खर्च महापालिका का करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रस्त्यांवर पादचारी, सायकलस्वारांना प्राधान्य
पादचारी, खासगी वाहनचालक, बस जितका रस्ता वापरतात, त्यानुसार शहरातील रस्ते विकसित करण्यात येत आहेत. या नव्या संकल्पनेमुळे पादचारी व सायकलस्वारांना सुरक्षित मार्ग मिळणार आहे. परिणामी, पायी व सायकलने ये-जा करणार्‍यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे वायू व ध्वनिप्रदूषणात घट होणार आहे. चालल्यामुळे व सायकलचा वापर केल्याने नागरिकांचे आरोग्य अधिक चांगले होण्यास मदत होणार आहे. हरित सेतू प्रकल्पाअंतर्गत पदपथ व सायकल ट्रॅक उद्यानांना जोडण्यात येणार आहेत. पदपथावरील अतिक्रमणे क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून हटविली जातात, असे महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

विविध मार्गांवर पदपथ व सायकल ट्रॅकचा खर्च
दापोडी ते पिंपरी (दोन्ही बाजू)-109 कोटी
पिंपरी ते निगडी (एक बाजू)-60 कोटी
निगडी ते पिंपरी (एक बाजू)- अंदाजे 60 कोटी
टेल्को रोड-लांडेवाडी ते थरमॅक्स चौक-160 कोटी
बिर्ला रुग्णालय ते डांगे चौक-19 कोटी
डांगे चौक ते कस्तुरी चौक-15 कोटी
शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक-55 कोटी
सांगवी ते किवळे-90 कोटी

दुभाजक गायब केल्याने अपघाताचा धोका
नव्याने रस्ते तयार करताना दुभाजक काढून टाकले जात आहेत. दुभाजक नसल्याने समोरासमोर वाहने येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच, लहान व मोठे अपघात होत आहेत. गतिरोधकासाठी दगडाचा वापर केला जात आहे. ते दगड वारंवार तुटत असल्याने तेथे खड्डे निर्माण होत आहेत. त्या खड्ड्यात वाहनाचे चाक आपटून चालकांना दुखापत होत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news