वाहतुकीचा दंड ऑनलाईन भरताय ! त्यापूर्वी हे वाचा

वाहतुकीचा दंड ऑनलाईन भरताय ! त्यापूर्वी हे वाचा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वाहतुकीचा नियम मोडल्याप्रकरणी तुम्हाला वाहतूक विभागाकडून दंड करण्यात आला आहे. तसेच, ऑनलाईन दंड भरण्यासाठी मोबाईलवर लिंकही पाठवण्यात आली आहे. तर, जरा थांबा..! कारण सायबर चोरट्यांनी
आता वाहतूकचालकांना लुटण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे. ऑनलाईन चलन भरण्यासाठी बनावट लिंक पाठवून सायबर चोरटे बँक खात्यातील रक्कम लांबवत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड सायबर सेलने ऑनलाईन दंड भरताना खात्री करण्याचे आवाहन केले आहे.

…तर वेळ घालवू नका
सायबर चोरट्यांनी तुमच्या बँक खात्यातील रक्कम इतर खात्यावर वर्ग करून घेतली असल्यास घाबरून जाऊ नका. लगेचच नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टगिं पोर्टल NCCRP) च्या हेल्पलाइन क्रमांक 1930 वर कॉल करा. त्यांना सविस्तर माहिती देऊन फसवणुकीची तक्रार करा. तसेच, सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरही तक्रार करा. यासह तुमच्या बँकेत आणि जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर सेलकडे जाऊन तक्रार नोंदवा. ज्यामुळे तुमचे पैसे माघारी मिळवण्यात पोलिसांना मदत होईल.

लिंकचा शेवट gov. in ने झाला आहे का ?
तुमच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजमध्ये दिलेली लिंक हुबेहूब परिवहन विभागाच्या मूळ लिंक सारखी दिसते. मात्र, वाहनचालकांनी पैसे भरताना घाई करू नये. मेसेज बारकाईने पाहिल्यास काही फरक लक्षात येईल. सायबर चोरटे https:// echallan. parivahan. in/ ही लिंक शेअर करतात. तर, परिवहन विभागाच्या वेबसाइटची लिंक https:// echallan. parivahan. gov. in/ अशी आहे. शासनाने जारी केलेली कोणतीही लिंक gov. in नेच संपते. त्यामुळे लिंकवर क्लिक करण्यापूर्वी खात्री करून घ्यावी.

अशी आहे मोडस ऑपरेंडी
सायबर चोरटे तुमच्या मोबाईलवर ई-चलनचा मेसेज पाठवतात. हुबेहूब परिवहन विभागाच्या मूळ वेबसाइटसारखा मेसेज तयार केल्यामुळे अनेकजण याला बळी पडतात. या मेसेजमध्ये ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी एक लिंक दिलेली असते. त्यावर क्लिक करताच सायबर चोर तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डसह बँक खात्याची गोपनीय माहिती स्कॅन करतात. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत बँक खात्यावरील पैसे परस्पर हस्तांतरित करून घेतले जातात.

तुम्हाला दंड आकारण्यात आल्यास त्याचा अलर्ट कोणत्याही खासगी क्रमांकावरून येत नाही. त्यामुळे खासगी मोबाईल क्रमांकावरून आलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी वाहनधारकांनी स्वतः सर्व तपशील तपासून घेणे गरजेचे आहे. परिवहन विभागाच्या मूळ मेसेजमध्ये तुमच्या वाहनाचे इंजिन नंबर, चासी नंबरसारखे इतर तपशील असतात. या उलट चोरट्यांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये कोणतेच तपशील नसतात. मोबाईलवर मेसेज आल्यास वाहनचालकांनी शासनाच्या वेबसाइटवर जाऊन दंड आकारण्यात आला आहे की नाही, हे तपासणे गरजेचे आहे.
                  -डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news