मराठा मंत्री, आमदार, खासदारांनी राजीनामे द्यावेत ; मराठा समाज आंदोलकांची संतप्त प्रतिक्रिया | पुढारी

मराठा मंत्री, आमदार, खासदारांनी राजीनामे द्यावेत ; मराठा समाज आंदोलकांची संतप्त प्रतिक्रिया

विजय चव्हाण

केडगाव : न्याय्य मागण्यांसाठी शांततेने उपोषण करीत असलेल्या गरीब, वंचित मराठा समाजावर पोलिसांचा अमानुष लाठीहल्ला होतो. अश्रुधुराच्या नळकांड्या फुटतात, मायबहिणींना पोलिसांच्या मारात जखमा होतात, हे दृश्य मराठा समाजातील आमदार, खासदार, मंत्र्यांना पाहिले तरी कसे जाते? ते जागेवरच राजीनामा का देत नाही? याच समाजाच्या मतांवर विजयी झालेले हे लोक पदाला का चिकटून बसलेत? अशी संतप्त प्रतिक्रिया गावागावांतील मराठा समाज उपस्थित करू लागला आहे.

विविध राजकीय पक्षांमध्ये 150 पेक्षा अधिक मराठा आमदारांचा भरणा आहे. पैकी काही मंत्रिमहोदय आहेत. बहुसंख्य खासदार आहेत. या लाठीहल्ल्याबाबत त्यांनी गुळमुळीत निषेधांशिवाय कुठल्याही स्वरूपाची फिकीर केलेली नाही. अशा स्वरूपाचे मत व्यक्त करताना ही चर्चा वादळासारखी गावापासून तालुक्यापर्यंत कडवट प्रतिक्रियाव्दारे उमटू लागली आहे. ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणेला मराठा राज्यकर्ते अपवाद आहेत की काय? असाही प्रश्न यानिमित्त ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. सर्व मराठा समाज आमदार, खासदारांनी या घटनेची दखल घेऊन तत्काळ राजीनामे द्यावेत आणि समाजबांधवांसाठी आपल्याला असलेली आपुलकी दाखवून गरीब समाजबांधवांच्या मांडीला मांडी लावून या प्रकरणामध्ये पाठबळाची अपेक्षा यानिमित्त व्यक्त होत आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे घडलेल्या आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आता उमटताना दिसत आहेत. राज्यात ’रास्ता रोको’, जाळपोळ करताना मराठा समाजबांधवांचा उद्रेक दिसू लागला आहे. गावोगावी बंद करून निषेध होऊ लागला आहे. मराठा राज्यकर्ते मात्र याबाबत खंबीर भूमिका घेताना दिसत नाही. सत्तेत असणारे समाजबांधव तोंडाला चिकटपट्टी लावून बसलेले आहेत आणि जे भेटीसाठी येतात ते फक्त आश्वासने देत आहेत. ज्यांना लाठीमार झाला ते वेदनेने व्याकुळ होऊन बसलेले आहेत.
राज्यात मराठा समाजबांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न घेऊन उपोषणाला बसलेल्या या बांधवांना आत्तापर्यंत अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यांच्या समर्थनासाठी प्रसारमाध्यमांसमोर जळजळीत प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर आगपाखडसुद्धा केलेली असली, तरी सत्तेत असणारे समाजबांधव अद्याप तोंड उघडताना दिसत नाहीत. ज्यांनी उघडले त्यांनी आम्ही हे कृत्य केलेलेच नाही, अशी बतावणी केलेली आहे. शासन चालविणारे म्हणतात ’आम्ही केलेलेच नाही’ हे फारच गंभीर आहे. सरकार आणि पोलिस यांचे संबंध नाही का? पोलिस सरकारचे नाहीत का? अशी शंका यानिमित्त मराठाबांधव विचारू लागलेले आहेत.

राज्य सरकार आणि पोलिस यांच्याकडून ही घटना बेजबाबदारपणे हाताळण्यात आलेली आहे. योग्य त्या चर्चेने सुटणारा प्रश्न होता. मात्र, त्याला वेगळे वळण दिले आहे. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
                         राजेंद्र कोंढरे, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ

समाजावर अन्याय झाला असताना समाजातील आमदार, खासदार सांत्वन करीत बसलेले आहेत. त्यांनी त्यांची नैतिकता म्हणून राजीनामा देऊन समाजासाठी त्यांच्याबरोबर रस्त्यावर उतरले पाहिजे. ‘एक मराठा लाख मराठा’ या सामाजिक ब—ीदवाक्याला साजेल असे वागले पाहिजे.
               दिलीपराव जगताप, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ 

 

हेही वाचा 

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तुफान धुमश्चक्री! गोळीबारानंतर तोरखाम सीमा सील

पुणे : दिवे घाटात आढळला बेपत्ता मुलाचा मृतदेह; खून केल्याचे तपासात उघड

Back to top button