पुणे : दिवे घाटात आढळला बेपत्ता मुलाचा मृतदेह; खून केल्याचे तपासात उघड | पुढारी

पुणे : दिवे घाटात आढळला बेपत्ता मुलाचा मृतदेह; खून केल्याचे तपासात उघड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोंढवा परिसरातून बेपत्ता झालेल्या 16 वर्षीय मुलाचा कुख्यात गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी खून करून मृतदेह दिवे घाटात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुनाच्या घटनेनंतर कोंढवा पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत, तर एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी व त्याचे साथीदार पसार आहेत. महादेव गोविंद गजाकोष (रा. शिवनेरी), प्रणय सुनील पवार (वय 19) व सौरभ माणिक तायडे ऊर्फ दत्ता (वय 18) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या घटनेत अनुष अमोल पायाळ (वय 16, रा. एनआयबीएम रोड) याचा खून झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साया लोणकर ऊर्फ साईनाथ तसेच ओंकार कापरे ऊर्फ आप्पा हे मुख्य आरोपी आहेत. दरम्यान, ते पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, एकावर एमपीडीए तसेच तडीपारीची कारवाई केलेली आहे. अल्पवयीन मुलगा आणि त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र आणि आरोपी ओळखीचे आहेत.

दरम्यान, शनिवारी अनुष रात्री नऊच्या सुमारास घरातून ढोल-ताशावादनाच्या सरावासाठी बाहेर पडला होता. परंतु, तो घरी परतला नाही. त्यामुळे अनुषच्या आईने कोंढवा पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तो अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. मात्र, दुसर्‍या दिवशी सासवड पोलिसांना दिवे घाटात एक मृतदेह असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी येथे धाव घेतली. त्याच्या फोटोवरून तो अनुष असल्याचे समोर आले.

हेही वाचा

पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षक पुरस्कार जाहीर

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलासा

अहमदनगर ; महापालिकेत शुकशुकाट, कामकाज ठप्प; सातव्या वेतन आयोगासाठी कर्मचार्‍यांचा संप

Back to top button