

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मानाजीनगर (नर्हे) येथील स्प्रिंगफिल्ड सोसायटीतील एका व्यावसायिकाच्या घरातून चोरट्यांनी 19 लाख 42 हजार रुपयांचा किमती ऐवज चोरी केला. ही घटना 3 सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी शशिकांत मोरे (वय 31) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा हॉटेल व्यवसाय असून, त्यांनी विविध ठिकाणी फ्रेन्चाइजी दिल्या आहेत. 3 सप्टेंबर रोजी ते कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. त्यामुळे त्यांचे राहते घर कुलूपबंद होते.
त्याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे दागिने आणि रोकड असा 19 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. दरम्यान, फिर्यादी हे घरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक यादव करीत आहेत.
श्रीधरनगर धनकवडी येथील साईकृपा सोसायटीतीतल एका बंद सदनिकेतून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू असा 6 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी, युवराज निगडे (वय 38) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत घडली आहे. फिर्यादींची सदनिका बंद असताना, चोरट्यांनी घराच्या मेन दरवाजाचे लॉक कशाच्यातरी साह्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर रोकड, दागिने आणि इतर मौल्यवान ऐवज चोरी करून पळ काढला.
सिंहगड रोड परिसरात फोडण्यात आलेल्या सर्व सदनिका कुलूपबंद होत्या. नागरिकांनी सेफ्टी दरवाजाला लॅचलॉक लावावे. कुलूप लावल्यामुळे सदनिका बंद असल्याचे दिसून येते. त्यामुळे चोरट्यांना घर बंद असल्याचे समजते.
– जयंत राजूरकर, पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड
हेही वाचा