कोकण आंबा बोर्ड लवकरच! | पुढारी

कोकण आंबा बोर्ड लवकरच!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : काजू बोर्डाप्रमाणे कोकणातील प्रस्तावित आंबा बोर्ड सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. आंबा उत्पादन वाढीसाठी टास्क फोर्स नियुक्त करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. आंबा आणि काजू उत्पादकांच्या प्रश्नांवरील बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा पिकतो. विमा, उत्पादनवाढ, औषध फवारणी तसेच उत्पादकांना प्रोत्साहन, संशोधन अशी बोर्डाची व्याप्ती व्यापक ठेवा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

प्राधिकरण अंतिम टप्प्यात

कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना अंतिम टप्प्यावर आली असून, या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने कोकणची आणि विशेषत: तेथील शेतकरी, उत्पादक यांची उन्नती करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आंबा उत्पादनवाढीसाठी टास्क फोर्स

दापोली कृषी विद्यापीठाने दिलेल्या अहवालानुसार, आताच्या हंगामात आंब्याचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत एकदम कमी म्हणजे केवळ १५ टक्के झाले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून थ्रिप्स रोगामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आंबा हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे फळ आहे. असे नुकसान होत राहिल्यास उत्पादकांना मोठा फटका बसतो. यावर गुजराण करणाऱ्या लाखो कुटुंबांनाही झळ सोसावी लागते, हे लक्षात घेता कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तत्काळ एक टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या टास्क फोर्समध्ये कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, तसेच प्रगत नामवंत प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञ यांचा समावेश असेल. या टास्क फोर्सची एक बैठक लगेच घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Back to top button