Teacher News : सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापकांना निवडश्रेणी प्रशिक्षणातून सवलत | पुढारी

Teacher News : सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापकांना निवडश्रेणी प्रशिक्षणातून सवलत

पुणे : राज्यात 31 जुलै 2022 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ आणि निवड श्रेणीस पात्र शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. या निर्णयाचा राज्यभरातील सेवानिवृत्त शिक्षकांना फायदा मिळणार आहे. राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक महाविद्यालयातील शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी प्रशिक्षण लागू आहे. त्यात दहा दिवस किंवा 50 घड्याळी तासांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत 2021 मध्ये निर्णय घेण्यात आला.

त्या वेळी प्रशिक्षण सुरू करण्याचा अंदाजित कालावधी लक्षात घेऊन 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत सेवानिवृत्त होणार्‍या किंवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्यात आली होती. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापकांना लागू करण्यात आला. मात्र, प्रशिक्षण कार्यक्रम विकसित झाल्यानंतर 1 जून 2022 पासून प्रशिक्षण सुरू करण्यात आल्याने प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळण्यास 45 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्यामुळे वरिष्ठ आणि निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना 31 मे 2022 पर्यंत, 31 जुलै 2022 अखेर सेवानिवृत्त शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणाची संधी मिळाली नाही.

शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

या पार्श्वभूमीवर शासनस्तरावरून प्रशिक्षणाचे आयोजन न झाल्याने, प्रशिक्षणाची संधी उपलब्ध न झाल्याने प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आता 31 जुलै 2022 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ आणि निवडश्रेणी पात्र शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्यात येत असल्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शरद पवार एकाच मंचावर

पंतप्रधानांची सुरक्षा सांभाळणारे SPG प्रमुख अरुण कुमार सिन्हा यांचे निधन

जुनी डबलडेकर १५ ला घेणार निरोप

Back to top button