दिवे घाटात रस्त्यावर जखमी बिबट्याचा ‘ठिय्या’ | पुढारी

दिवे घाटात रस्त्यावर जखमी बिबट्याचा ‘ठिय्या’

फुरसुंगी : हडपसर-सासवड मार्गावरील दिवे घाटात रविवारी सकाळी रस्त्याच्या मधोमध जखमी बिबट्या बसला असल्याचे प्रवाशांना दिसून आले. त्याने सुमारे अर्धा तास रस्त्यावर ठिय्या मांडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने किंवा तो डोंगरावरून पडून जखमी झाला असल्याची शक्यता प्रवाशांनी वर्तवली आहे. रस्त्याच्या मधोमध बसलेला बिबट्या थोड्या वेळाने लटपटत त्या जागेवरून उठला आणि सावकाशपणे रस्ता ओलांडून डोंगर उताराच्या दिशेने निघून गेला. या वेळी प्रवाशांनी या बिबट्याचे छायाचित्र व व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये टिपले. बिबट्या रस्त्याच्या मधोमध बसला असल्याने घाटात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

वडकी, फुरसुंगी परिसरात बिबट्याचे स्थानिकांना दर्शन होत आहे. या भागातील पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. रात्री-अपरात्री शेतामध्ये जाण्यास शेतकर्‍यांना भीती वाटत असून, वनविभागाने तत्काळ बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.

रविवारी सकाळी नऊच्या सुमारास गावी जात असताना दिवे घाटात गर्दी दिसली. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता रस्त्याच्या मधोमध जखमी झालेला बिबट्या बसलेला असल्याचे दिसून आले.
                                                            – विजय भोसले, प्रत्यक्षदर्शी

जखमी बिबट्याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीम दिवे घाटात पाठवली आहे. मात्र, अद्याप बिबट्या आढळून आला नाही.
                                                           -राजकुमार जाधव, वनसंरक्षक

 

हेही वाचा :

माहेरी जाण्यावरून विवाहितेला दिले सिगारेट, इस्त्रीचे चटके

पुणे : वर्गणी दिली नाही म्हणून बांबूने मारहाण

Back to top button