

मंचर : रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरी जायचे असल्याने पतीने दारू पिऊन पत्नीला मारहाण केली तसेच गेले काही दिवस सिगारेट आणि इस्त्रीचे चटके दिल्याचा गंभीर प्रकार निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे उघड झाला. विवाहिता साक्षी लबडे यांनी पारगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.
विवाहिता साक्षी लबडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी (दि. 30 ऑगस्ट) सकाळी सात वाजता निरगुडसर येथे घरी असताना पती शंकर महादेव लबडे यांना रक्षाबंधन असल्याने मला माहेरी धोत्रे (ता. पारनेर) येथे जाण्याबाबत विचारले.
त्यामुळे पती शंकर यांनी चिडून जाऊन दमदाटी केली तसेच माहेरी जायचे असेल तर मला घटस्फोट दे आणि निघून जा, असे सुनावले आणि मारहाण केली. त्यानंतर पुन्हा सकाळी साडेआठ वाजता शंकर यांनी दारू पिऊन शिवीगाळ केली. तसेच 15 दिवसांपूर्वी शंकर यांनी पत्नी साक्षी यांना दारू पिऊन शिवीगाळ, मारहाण करीत तोंडावर सिगारेट आणि हातावर इस्त्रीचे चटके दिले. जोवर माहेरची जमीन नावावर करून देत नाही, तोवर घरात न घेण्याचा सज्जड दमदेखील दिला होता. हा मानसिक आणि शारीरिक छळ असह्य झाल्याने रागाच्या भरात बुधवारी (दि. 30) सकाळी नऊ वाजता टॉयलेट क्लीनर औषध प्यायले होते. पती शंकर हे नेहमी मानसिक, शारीरिक व लैंगिक छळ करतात, असे संबंधित विवाहितेने पारगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा तपास पोलिस जवान सांगळे करीत आहेत.
हे ही वाचा :